जौनपूरमधून बसपाच्या रेड्डी निवडणूक लढवणार नाहीत

जौनपूर – उत्तर प्रदेशमधील एक बाहुबली नेता , बहुजन समाज पार्टीचे (बसपा) माजी खासदार धनंजय सिंह यांनी जामिनावर सुटल्यानंतर आपली पत्नी श्रीकला रेड्डी-सिंह यांना पक्षाने दिलेले तिकीट परत केले. त्यामुळे आता जौनपूरमधून श्रीकला रेड्डी निवडणूक लढविणार नाहीत. त्यांच्याऐवजी विद्यमान खासदार श्याम सिंह हे बसपाचे उमेदवार असणार आहेत.
बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी काल रात्री एक वाजता फोन करून आपल्याला जौनपूर मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची संधी दिली जात आहे असे सांगितले, अशी माहिती श्याम सिंह यांनी आज दिली.
जौनपूर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीने (भाजपा) बरीच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेल्या कृपाशंकर सिंह यांना रिंगणात उतरविले आहे, तर समाजवादी पार्टीने (सपा) बाबू सिंह कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने श्रीकला रेड्डी-सिंह यांना तिकीट दिले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र आता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
जौनपूरमध्ये सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.
जौनपूरमधून सुरुवातीला धनंजय सिंह हे स्वतः निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. मात्र नमामि गंगे प्रकल्पाचे काम करणाऱ्या एक कंपनीचे व्यवस्थापक अभिनव सिंघल यांचे अपहरण आणि खंडणी मागितल्याच्या प्रकरणात धनंजय सिंह यांना न्यायालयाने दोषी ठरवून ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याने त्यांना आपला निर्णय रद्द करावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी श्रीकला यांचे नाव पुढे केले होते. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्यांनीच श्रीकला यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top