आळंदी मंदिरातून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान

आळंदी –

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार २९ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून पहिला मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. ही पालखी यावर्षी पुणे येथे ३० जून व १ जुलै रोजी आणि सासवड येथे २ व ३ जुलै असे दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस सोहळा मुक्कामी राहणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले.

पंढरपूर येथील आळंदी देवस्थानच्या माऊली मंदिर मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली परंपरेने झाली या बैठकीत नवनियुक्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्थ ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांचा दिंडी समाज संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. या बैठकीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी पालखी सोहळ्याचे पत्रिकेचे वाचन करून उपस्थितांना माहिती दिली.
पालखी सोहळ्याचे प्रवासादरम्यान पुण्यात संगमवाडी ते भवानी पेठ तसेच निंबोरे ओढा ते फलटण विमानतळ हे अंतर पायी वारीतील वाटचालीस खूप जास्त आहे. यामध्ये सुवर्णमध्य काढून पालखी सोहळ्याला अर्ध्या तासाचा विसावा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. ह. भ. प. राजाभाऊ थोरात आणि नामदेव महाराज वासकर यांनी मागणी केली आहे. प्रवासात विसावा वाढला तर रात्रीच्या समाज आरतीस उशीर होतो. या बाबत विचार करून नियोजन करण्याची मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली आहे.
आळंदी ते पंढरपूर या पायी वारी प्रवासात विसाव्यास जागा नसल्याने शासनाने रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावर्षी वाखरी ते पंढरपूर या रस्त्याचे काम सुरू आहे. पालखी तळ खाली तसेच रस्ता वर झाला आहे. यामुळे वाहनांना अडचण येणार असल्याने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top