ज्युनिअर महमूद यांचे निधन कर्करोगाशी झुंज अयशस्वी

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे वयाच्या ६७व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. आज दुपारी १२ वाजता ज्युनिअर मेहमूद यांच्या पार्थिवावर जुहू येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून ज्युनिअर महमूद कर्करोगाशी झुंजत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे मित्र आणि अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या दोन्ही मित्रांनी त्यांची ही इच्छा देखील पूर्ण केली होती.

नईम सय्यद हे ज्युनियर मेहमुद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना ‘ज्युनियर मेहमुद’ हे नाव प्रसिद्ध अभिनेते आणि गायक मेहमुद अली यांनी दिले होते. त्यांनी ७ वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल २६५ चित्रपटांमध्ये काम केले असून ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते. ज्युनियर मेहमुद आणि सचिन पिळगावकर यांनी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. या दोघांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ज्युनियर मेहमुद यांनी जितेंद्रबरोबर ‘सुहाग रात’, ‘कारवाँ’, ‘सदा सुहागन’सह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सिनेसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कॉमेडी भूमिकांनी प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, सुना आणि एक नातू असा परिवार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top