ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबई
मराठी रंगभूमी तसेच मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विलक्षण अभिनय क्षमतेने लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपाच्या भूमिकांपासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.

अशोक सराफ यांनी १९६९ पासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु केली. त्यांनी आतापर्यंत अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रामुख्याने विनोदी भूमिका केल्या असल्या तरी त्यांच्या अनेक गंभीर भूमिकाही गाजल्या. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या बरोबरीने त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. मराठी सिनेमाबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटातही महत्वाच्या भूमिका केल्या. हिंदीत त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही भूमिका केल्या. त्यांची ‘हम पांच’ ही मालिका खाजगी वाहिनीवर प्रचंड गाजलेली मालिका ठरली. अशोक सराफ यांनी अनेक आशयघन मराठी नाटकांमध्येही भूमिका केल्या. करमणूक क्षेत्रातल्या त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना राज्याचा सर्वात प्रतिष्ठेचा असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top