ट्रम्प यांच्या अडचणीत पुन्हा वाढ हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

वॉशिंग्टन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन संसदभवनात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात यूएस फेडरल अपील न्यायालयाच्या वकिलांनी आरोप केले आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीबाबत खोटे वक्तव्य केले आणि हिंसाचारालाही प्रोत्साहन दिल्याचे वकिलांना म्हटले आहे. ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक निकालांना गुन्हेगारीपध्दतीने रोखण्यासाठी आपल्या समर्थकांना अमेरिकन संसदभवनात पाठवले.या प्रकरणी अपील कोर्टाने ट्रम्प यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी विशेष वकील जॅक स्मिथ यांनी न्यायालयात काही कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांनुसार ट्रम्प यांनी नोव्हेंबर २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी केलेल्या कृती आणि कथित धमक्यांबाबत पुरावे सादर करण्यासाठी काही काळाचा अवधी मागितला आहे. जो बायडन यांचा निवडणूक विजय खोटा ठरवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता,हे सिध्द करता येईल. या खटल्याच्या सुनावणीवेळी सर्व पुरावे सादर केले जातील, असे वकिलांनी सांगितले. दरम्यान, २०२० मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला होता. यानंतर ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदभवनाला घेराव घातला. यादरम्यान ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेची तोडफोड आणि जाळपोळ केली. ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या हिंसाचारात एका पोलिस अधिकाऱ्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. ट्रम्प यांच्यावर या हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top