ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार हालचाली सुरू

ठाणे – ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या पार्श्‍वभूमीवर पालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मंदिराची नुकतीच पाहणी केली.यावेळी माती आणि बांधकाम संरचनात्मक परिक्षणानंतर ही वास्तू दुरुस्त करायची की संपूर्ण मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करायचा याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिरात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे चार फूट तीन इंच उंचीचे आणि १२ फुटी घेर असलेले शिवलिंग आहे. ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इ. स. ८१० ते १२४० दरम्यान बांधले गेले. १८७९ मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोध्दार करण्यात आला. त्यानंतर १९९६ मध्ये या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला.मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मंदिराचा जीर्णोद्धार,मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचा संकल्प केला असून त्यासाठी त्यांनी मंदिर परिसराची विश्वस्तांसोबत पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार महापालिका आयुक्तांनी विश्वस्तासमवेत मंदिर परिसराची पाहणी करून बैठक घेतली.बैठकीस विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेगे हे उपस्थित होते.
यावेळी आयुक्त बांगर म्हणाले की,मुख्य मंदिराची रचना, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पुण्यातील वास्तुरचनाकार अरूण कलमदानी यांनी या मंदिराचा आराखडा तयार केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top