ठाण्यातील गायमुख चौपाटी खचली धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेश बंदी

ठाणे – ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र,मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या गायमुख चौपाटीचा काही भाग खचल्याचा प्रकार काल बुधवारी समोर आला.त्यानंतर याठिकाणी धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.अवघ्या पाच वर्षातच ही गायमुख चौपाटी खचल्याने या चौपाटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ठाण्यात ज्या जागेवर गायमुख चौपाटी उभारण्यात आली आहे,ती जागा मेरिटाइम बोर्डाची आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे १२ कोटी ८४ लाख निधी दिला आहे.मेरिटाइम बोर्डाने या चौपाटीचे काम केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या चौपाटीला देण्यात आले आहे.या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये झाले होते. या चौपाटीचा खाडीलगतचा काही भाग खचल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहेत.या चौपाटीवर नागरिक मोठ्या संख्येने येत असतात.यामुळे खचलेल्या भागात अपघात होऊ नये यासाठी येथे धोकापट्टी लावून परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

याबाबत मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते यांनी सांगितले की, खचलेल्या भागाची आयआयटीच्या पथकाकडून पाहाणी करण्यात आली असून त्याचा त्यांनी अहवालही दिला आहे. खाऱ्या पाण्यामुळे खाडीलगतच्या खांबामधील लोखंड गंजल्याने हा प्रकार घडला असून या ठिकाणी आयआयटीने सुचविल्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी साडे तीन कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top