नवी दिल्ली- रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या ८.५ अब्ज डॉलरचे प्रस्तावित विलीनीकरण हे माध्यम क्षेत्रातील स्पर्धेसाठी हानीकारक ठरेल, असा निष्कर्ष सीसीआय अर्थात
भारतीय स्पर्धा आयोगाने आपल्या गोपनीय प्राथमिक मूल्यांकन अहवालात काढला आहे. रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या नियोजित विलीनीकरणाला हा मोठा धक्का आहे.
स्पर्धा आयोगाने डिस्ने आणि रिलायन्सला त्यांचे मत खासगीरीत्या विचारले आहे. शिवाय उभय कंपन्यांना त्यांच्या चौकशीचे आदेश का दिले जाऊ नयेत याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. स्पर्धा आयोगासाठी क्रिकेट प्रसारण हक्क हा सर्वात त्रासदायक मुद्दा आहे.आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या कंपनीला विलीनीकरणामुळे क्रिकेटच्या प्रसारणासाठी अब्जावधी डॉलरचे फायदेशीर हक्क मिळतील, ज्यामुळे एकाधिकारातून जाहिरातदारांवर मनमानी किमतीसह त्यांची पकड मजबूत होण्याची भीती आहे, असे स्पर्धा आयोगाचे मत आहे. रिलायन्स, डिस्ने आणि आयोगाने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.स्पर्धा आयोगाची प्रक्रिया गोपनीय असल्याने सर्व सूत्रांनी नावे जाहीर करण्यास नकार दिला.