तब्बल ४५ तासांच्या प्रयत्नानंतर व्हेलचे पिल्लू समुद्रात परतले

रत्नागिरी :

गणपतीपुळे येथे वाळूत अडकलेल्या व्हेल माशाच्या पिल्लूचे जीव वाचवण्यासाठी वन विभाग, तटरक्षक दल आणि गणपतीपुळे येथील ग्रामस्थांनी तब्बल ४५ तासांहून अधिक काळ प्रयत्नांची पराकष्ठा केली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे ३० फूट लांब व्हेलचे पिल्लू काल रात्री सुखरूप समुद्रात परतले.

सोमवारी सकाळी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर भलामोठा व्हेल मासा आढळून आला होता. तो जिवंत होता आणि लाटांच्या भरती ओहोटीच्या खेळात तो या किनाऱ्यावर वाळूत अडकला होता. याची माहिती मिळताच गणपतीपुळे येथील ग्रामस्थांसह वन विभागाने किनारपट्टीवर धाव घेतली आणि या जिवंत माशाला पुन्हा समुद्रात पाठवण्याचे व्हेल मिशन सुरु झाले.

समुद्र किनाऱ्यावर अडकलेला हा भलामोठा मासा म्हणजे व्हेलचे अडीच ते तीन महिन्यांचे पिल्लू होते. तरीही त्याची लांबी ३० फूट आणि वजन अडीच ते तीन टन इतके होते. सुरुवातीला भरतीचे पाणी किनाऱ्यावर आले की मासा पुन्हा समुद्रात जाईल ही शक्यता खोटी ठरली. वाळूत अडकलेल्या व्हेल माशाला बाहेर काढून समुद्रात ढकलण्यासाठी २ जेसीबी मागवण्यात आले. त्याला उचलून समुद्रात टाकण्यासाठी तटरक्षक दलाने आपले हेलिकॉप्टर सज्ज ठेवले होते. मात्र या सगळ्याचा काहीच उपयोग होत नव्हता. सर्व प्रयत्नानंतर वन विभागाने पुण्याहून त्यांची रेस्क्यू टीम बोलावली. दरम्यान या पिल्लाची पशुवैद्यकांकडून तपासणी करून त्याला औषध सुद्धा देण्यात आले होते. अखेरीस सर्वांच्या सांघिक प्रयत्नानी काल रात्री व्हेलचे ते पिल्लू सुखरूप त्याचा परतीच्या प्रवासासाठी समुद्रात परतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top