तरुणीवर व्हर्च्युअल-आभासी अत्याचार! नव्या युगाचे नवे गुन्हे आणि शिक्षाही

लंडन –
डिजीटल क्रांती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या अफाट प्रगतीचे लाभ आपण सारे सध्या घेत आहोत. सोशल मीडियामुळे तर जग हे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. या सोशल मीडियाचे जसे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा दुरूपयोग करून महिलांना धमकावणे, त्यांची बदनामी करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. अशाच प्रकारचे मात्र काही अधीक गंभीर असे प्रकरण ब्रिटनमधून समोर आले आहे. येथे एका किशोरवयीन मुलीवर मेटावर्स प्लॅटफॉर्म काही तरुणांनी आभासी अत्याचार केला आहे. या प्रकरणी ब्रिटनमध्ये पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल केला असून अशा प्रकारची जगभरातील ही पहिलीच घटना आहे.

ब्रिटनमधील एका आघाडीच्या वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त प्रसिध्द केले आहे. त्यानुसार मेटावर्सच्या प्लॅटफॉर्मवर एका व्हर्च्युअल रिॲलिटी गेममध्ये या किशोरवयीन तरुणीची आभासी छबी ऑनलाईन रूममध्ये होती. या ऑनलाईन रूममध्ये त्यावेळी अनेक पुरुष होते. त्यांनी याच ऑनलाईन रूममध्ये या तरुणीवर आभासी अत्याचार केला आहे. या घटनेत जरी या तरुणीला प्रत्यक्ष शारीरिक अत्याचाराचा सामना करावा लागला नसला तरी अशा अत्याचारांना सामोरे जाणाऱ्या महिलांना ज्या प्रकारे मानसिक त्रास होतो तसा त्रास आपल्याला झाला,असा आरोप या तरुणीने केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना ब्रिटन नॅशनल पोलीस चीफ काउन्सिलच्या महिला आणि बाल हक्क उल्लंघन तपास कक्षाचे प्रमुख इयान क्रिचले यांनी सांगितले की, अशा प्रकारचे व्हर्च्युअल गेमची निर्मिती करून मेटावर्सने आंबटशौकीन पुरुषांना महिलांशी आभासी छेडछाड करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळेच आमचे यापुढे अशाप्रकारच्या गुन्हयांकडे बारकाईने लक्ष असणार आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे सर्वांसाठी पूर्णपणे सुरक्षित असले पाहिजेत याची काळजी घेणे मेटावर्ससारख्या कंपन्यांची आहे. त्यांना याची जाणिव करून देणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top