…तर १० हजार कोटी वाचले असते! मेट्रोवरून आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबई- मेट्रोच्या कारशेड डेपोवरून माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. कांजूरमार्गमध्ये मेट्रो ३, मेट्रो ६, मेट्रो-४, मेट्रो-१४चे कारशेड झाले असते तर जनतेचे १० हजार कोटी रुपये वाचले असते. घटनाबाह्य सरकारने मेट्रोच्या चार मार्गिकांसाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी कारडेपो बांधण्याचा आणि त्यासाठी चार कंत्राटदार नेमण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री`वर पत्रकार परिषद घेऊन केला.

आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही अनेक वर्ष मागणी केली की, मेट्रोचा कारडेपो आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गला न्या. आमच्या महाविकास आघाडी सरकारने तसा निर्णयही घेतला होता. मात्र शिंदे गट-भाजपने आमचे सरकार पाडून सर्वात आधी मेट्रो कारडेपो कांजूरमधून पुन्हा आरे कॉलनीला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता मेट्रो-६च्या कारशेडचे काम कांजूरमार्गमध्ये राज्य सरकारने या वर्षांपासून सुरू होणार आहे. यासाठी २ दिवसांपूर्वी ई-टेंडर नोटीस काढली. कांजूरमार्गच्या जागेवर महाविकास आघाडी सरकार इंटीग्रेटेड कारडेपो बांधणार होतो. मेट्रो-३, मेट्रो-६, मेट्रो-४, मेट्रो-१४ची कारशेड बांधणार होते. इंटीग्रेटेड कार डेपो बांधला असता तर त्यात १० हजार कोटी रुपये वाचले असते.

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्ता कामाच्या घोटाळ्याविषयीही भाष्य केले. ते म्हणाले की, जानेवारीमध्ये मुंबईतील रस्त्यांचे भूमिपूजन झाले, अजूनही एकाही रस्त्याची कामे सुरू केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील हे कंत्राटदार रस्त्याचे कंत्राट दिले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंत्राटदाराला पावसाळ्यात नोटीस देणार होते, त्यानंतर कोणती सेटलमेंट झाली माहीत नाही. आता १ ऑक्टोबर होऊन गेली तरी रस्त्याची कामे सुरूच नाहीत. पालिकेने एका कंत्राटदाराला नोटीस बजावली. तुमचे कंत्राट रद्द का करु नये, १५ दिवसांत उत्तर द्यावे, अशी नोटीस महापालिकने कंत्राटदाराला बजावली. आता पुन्हा सेटलमेंट होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top