ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध माया वाघीणीचा मृत्यू?

चंद्रपूर
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील क्वीन म्हणून ओळख असलेली माया वाघीण 23 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 ते 18 नोव्हेंबरदरम्यान ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी आणि दीडशे कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या शोध मोहिमेत एका वाघाचे कुजलेले अवयव सापडले. आता या अवयवाची डीएनए चाचणी केली जाणार आहे.
मानवी हस्तक्षेप नसलेल्या ताडोबा वनक्षेत्रातील ताडोबा बीटात 82 क्रमांकाच्या कक्षात हे अवयव आढळले आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प हिवाळी पर्यटनासाठी पुन्हा एकदा खुला झाल्यानंतर माया वाघीण दर्शन देत नसल्याने वनविभाग व पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया वाघिणीच्या शोधासाठी वनविभागाने शोध मोहीम राबविली होती. एका वाघाच्या सापडलेल्या अवयवांची माया वाघिणीच्या डीएनएशी पडताळणी केली जाणार आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत माया वाघिणीच्या मृत्यूबाबत स्पष्टपणे खुलासा होण्याची शक्यता आहे.
13 वर्षे आयुष्य लाभलेली माया वाघीण पर्यटकांना सहज दर्शन देत असे. ती या प्रकल्पाचे आकर्षण होती. लीला आणि हिलटॉप टायगर हे तिचे आईवडील होते. 2014 पासून ती पाच वेळा गर्भवती होती. तिने 13 बछड्याना जन्म दिला. 2014 पासून ताडोबातील प्रत्येक वन्यजीव गणनेत माया प्रामुख्याने दिसत राहिली. ताडोबा आणि कोलारा वनपरिक्षेत्र हे विस्तीर्ण जंगल तिच्या भ्रमंतीचे क्षेत्र होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top