तारळी धरणाचे पाणी आज आरफळ कालव्यात सोडणार

कराड – पाटण तालुक्यातील डांगिस्तेवाडी तारळी धरणाचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत व हणबरवाडी-शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी कराड पूर्वेच्या मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यात उद्या सोमवार १८ मार्च रोजी तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईनमधून सोडणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
हे पाणी सोडण्याबाबत कुणा अधिकाऱ्याने हयगय केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे. उद्या पाणी सोडले नाही तर मसूरच्या चौकात शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा शेतकर्‍यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील मसूर, तालुका-कराड पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून दरवर्षी खरीप, रब्बी उन्हाळी आवर्तने दिली जातात. या आरफळ कालव्याचा कराड तालुक्यातील मसूर पूर्व भागातील सुमारे पाडळी हेळगाव पासून मेरवेवाडी राजमाचीपर्यंत सुमारे २५ गावे आहेत. हणबरवाडी-शहापूर उपसा सिंचन योजना चालू केल्यानंतर व आरफळ कालव्यामध्ये पाणी सोडल्यानंतर नळपाणी पुरवठा योजनेव्दारे लोकांना पिण्यासाठी व जनावरांची कायमस्वरुपी सोय होणार आहे. यावर्षी रब्बी हंगामातील कालवा सल्लागार समितीची पाणी आवर्तनाबाबत बैठक झाली नाही.जलसंपदा विभागाने सोयीनुरुप पाणी सोडले. परंतु प्रत्यक्ष उन्हाळी आवर्तनाचे नियोजन केलेले स्पष्ट होत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top