तीन शंकराचार्यांचे घूमजावअयोध्या सोहळ्याला पाठिंबा

अयोध्या- अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने तिथे प्राणप्रतिष्ठा करणे शास्त्राच्या विरोधात आहे असे म्हणत चार शंकराचार्यांनी 22 जानेवारीच्या सोहळ्यास अनुपस्थित राहणार, असे जाहीर केल्याने खळबळ माजली. मात्र आता या चार शंकराचार्यांपैकी तिघांनी घूमजाव केले आहे. चारपैकी तिघांनी सोहळ्याला पाठिंबा जाहीर केला. उत्तराखंडच्या शंकराचार्यांचा मात्र विरोध कायम आहे.
ओडिशाच्या जगन्नाथ पुरीतील गोवर्धन पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, उत्तराखंड ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य महा सन्निधानम स्वामी भारतीकृष्ण तीर्थ या चार शंकराचार्यांनी अयोध्येतील सोहळा शास्त्राला धरून नसल्याने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते. हिंदू धर्मातील इतक्या महत्त्वाच्या सोहळ्याला शंकराचार्यांनीच विरोध केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी आज सांगितले की, शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ आणि द्वारकापीठाचे स्वामी सदानंद सरस्वती या दोन शंकराचार्यांनी या सोहळ्याला पाठिंबा देत हा सोहळा म्हणजे सनातन धर्माच्या अनुयायांसाठी आनंदाचा क्षण आहे, असे जाहीर केले आहे. शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी म्हटले आहे की, शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात असल्याची विधाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी अशा प्रकारचे कुठलेही विधान केलेले नाही. धर्मविरोधी शत्रुंनी जाणूनबुजून हा कांगावा केला असल्याचा संशय आहे. मी या सोहळ्याला शुभेच्छा देतो. द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनीही असेच निवेदन दिले आहे.
ओडिशाच्या जगन्नाथ पुरीतील गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनीही सोहळ्याला पाठिंबा देत असल्याचे सांगितल्याची माहिती आलोक कुमार यांनी दिली आहे. या तिघा शंकराचार्यांनी अयोध्यातील सोहळ्याला पाठिंबा दिला असला तरी ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार नाहीत. ते योग्य वेळी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतील, असेही आलोक कुमार यांनी सांगितले. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मात्र अद्यापही विरोध कायम ठेवला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला होता. त्यात त्यांनी राम मंदिराचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे चारही मठाचे शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, आमच्या मनात कुणाच्याही प्रती द्वेष नाही. मात्र हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांनाही तसे करण्यास सुचवणे, ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात गुंतलेले लोक हिंदू धर्मातील नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाचा अभिषेक सोहळा आयोजित करणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वांचे पहिले उल्लंघन आहे. या सोहळ्यासाठी एवढी घाई करण्याची गरज नव्हती. 22 डिसेंबर 1949 च्या मध्यरात्री बाबरी मशिदीमध्ये रामाची मूर्ती ठेवण्यात आली तेव्हा आणि 1992 मध्ये ढाचा पाडला तेव्हा वेगळी परिस्थिती होती. ह्या घटना उत्स्फूर्तपणे घडल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही शंकराचार्यांनी तेव्हा सवाल उपस्थित केला नाही. मात्र आज तशी परिस्थिती नाही. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर अभिषेक करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करणे आणि देवाची मूर्ती बसवणे योग्य नाही. कार्यक्रमाचे आयोजक आम्हाला मोदींविरोधी म्हणतील, अशी शक्यता आहे. मात्र आम्ही मोदींविरोधी नाही, आम्ही आमच्या धर्मग्रंथांच्या विरोधात जाऊ शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top