तुझ्यासारखा मी सासर्‍यांच्या घरी तुकडे मोडत नाही जरांगेंना विरोध करताना भुजबळांनी दुसरे टोक गाठले

जालना – मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यास विरोध करीत तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आज ओबीसींची पहिली मोठी सभा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या जिल्ह्यात अंबड तालुक्यात झाली. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या सभेत जरांगे-पाटलांचा खरपूस समाचार घेतला. पाचवी शिकला की नाही माहीत नाही आणि याला न्यायमूर्ती सर, सर म्हणतात. खूप बोललास, तू माझ्याबद्दल. पण याद राख, माझ्या शेपटावर पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे खाणे काढू नकोस, मी स्वकष्टाचे खातो, तुझ्यासारखे सासर्‍याच्या घरी तुकडे मोडत नाही अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंवर नाव न घेता टीकेची झोड उठवली. सरकारकडे जातनिहाय गणनेची मागणी केली. मराठ्यांना जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन ओबीसी बांधवांना केले. महादेव जानकरांसह अन्य ओबीसी नेते या सभेला उपस्थित होते, मात्र पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या.
ओबीसी भटके विमुक्त बचाव एल्गार सभा अंबडमध्ये झाली. मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार अर्जुन खोतकर, आमदार गोपीचंद पडळकर, बबन तायवाडे, प्रकाश शेंडगे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला मोठी गर्दी जमली होती. आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, ‘शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण देऊन आमचे नुकसान केले असे काही लोक सांगतात. मंडल आयोग तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला आणि आरक्षण लागू केले पाहिजे असा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही अमलबजावणीची मागणी केली. पवारसाहेबांनी ती मागणी मान्य केली. केंद्राने आरक्षण मान्य केल्यानंतर ते अमान्य करण्याची मुभा नव्हती. हा ‘गरिबी हटाओ’चा कार्यक्रम नाही. हा वर्षानुवर्षे जे पिचलेले आहेत, त्यांना इतर समाजाबरोबर वर आणण्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण का आहे ते आधी समजून घ्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. लाखालाखांचे 58 मोर्चे निघाले. आम्ही विरोध केला नाही. आरक्षण द्या अशीच आमची भूमिका होती, पण दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात अडकले. पण तेव्हा अशी कोणाची घरे, दुकाने जळली नाही. मराठा समाजाच्या नेत्यांचीही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका होती. घरे जाळण्याची भूमिका नव्हती. मराठी तरुणांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. या दगडाला शेंदूर लावून कशाला देव करता? हा कोणता शेंदूर लावलेला देव? लेकरं लेकरं करतो. आमचीही लेकरं आहेत. सुरुवातीला 250 ओबीसी जाती होत्या. आता ओबीसींच्या 375 जाती झाल्या. आम्ही विरोध केला नाही. आयोगाकडे गेले आणि नव्या जाती समाविष्ट झाल्या. कायद्याने या. स्वकीयांची घरे काय जाळता? हे उपोषणाला बसले. पाणी पिणार नाही. अमूक तारखेपर्यंत काम करा पाणी पिणार नाही. महाराज आले म्हणून पाणी पितो. मग पिणार नाही. नंतर राज्य सरकारने माजी न्यायमूर्तींनाच पाठवले. आमचे न्यायमूर्ती पाठीला शेक द्यावा लागेल इतके वाकले होते. न्यायमूर्ती याला सर म्हणतात. हा पाचवी शिकला की नाही माहीत नाही. याद राख माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. माझे खाणे काढतोस. मी दोन वर्षे तुरुंगात बेसन भाकर खाल्ली म्हणतो. होय मी खाल्ली, अगदी दिवाळीतही मी बेसन भाकर ठेचा कांदा खातो. पण तुमच्या सारखा सासर्‍याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडत नाही. ओबीसींना 27 टक्के आरक्षण कसे असे हा विचारतो. तिकडे बिहारमध्ये 65 टक्के आरक्षण दिले आहे. जातनिहाय गणना करा. दूध का दूध आणि पानी का पानी
होऊ दे.’
मराठा समाजाला आतापर्यंत आर्थिक मागास आरक्षणातून खूप फायदे मिळाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणि अन्य विविध योजनांच्या माध्यमांतून हजारो कोटींचा निधी मंजूर झाला आहे, असे म्हणत भुजबळांनी या योजनांची आणि त्याअंतर्गत मंजूर निधीची जंत्रीच वाचून दाखवली. त्यानंतर त्यांनी जालनातल्या हिंसाचाराबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘उपोषणाच्या वेळी पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो सर्वांनी पाहिला. 70 पोलीस महिला पोलिसांसह अ‍ॅडमिट झाले. जखमी झाले, ते नाही पाहिले. पोलीस जरांगेंना आधी उठवायला गेले होते. हे आधी म्हणाले येत नाही. महिला पोलीसही खूप होत्या. तुमची तब्येत बिघडली, रुग्णालयात चला असे पोलीस म्हणाले. पण हे हटले नाहीत. उलट दगडांचा मारा सुरू झाला. पोलीस जखमी झाले. महिला आयोगाने आणि अन्य महिला नेत्यांनी या महिला पोलिसांच्या घरी जाऊन काय घडले ते विचारा. पोलिसांनी लाठीचार्ज केला एवढेच सांगत होते. पण महिला पोलिसांवर हल्ला झाला त्याचे काय. हा लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे घरात जाऊन झोपले होते. राजेश टोपे आणि रोहित पवार त्यांना रात्री 3 वाजता घरातून घेऊन आले. म्हटले बस पवारसाहेब येणार आहेत. पवारांना सांगितले नाही की, लाठीचार्ज का झाला. पोलिसांचेही तोंड बंद होते. फडणवीसांना मी विचारले की, तुम्ही गृहमंत्री या नात्याने पोलिसांसोबत काय घडले ते सांगायला हवे होते. पण त्यांनी उलट पोलिसांनाच सस्पेंड केले. हात जोडून गुन्हे मागे घेतो सांगायला लागले. मग यांचा आवाज वाढला. प्रकाश सोळंकींचे बीडमधले घर जाळले. सर्व हत्यारे तयार होती. फरशा उखडायला पहारीही होत्या. पेट्रोल बॉम्ब होते. नेत्यांच्या घरांचे कोड नंबर देण्यात आले होते. सुभाष राऊत मंत्रालयात माझ्या चेंबरमध्ये बसला होता. तेव्हा आम्ही टिव्हीवर सोळंकींचे घर जळताना पाहिले. मी फोन केला तिथून की, दुसरा नंबर सुभाष राऊतचा लागणार आहे त्याला सुरक्षा पुरवा. त्याला म्हटले घरी जा. पण त्याचेही हॉटेल पहाटेपर्यंत पेटवले होते. जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर यांचे घर पेटवले. त्यांचीही लेकरं बाळं होती. मागच्या बाजूच्या भिंतींनी खुर्च्यांवर चढून महिलांनी आपल्या मुलांना वाचवलं. मुसलमानांनी मुलांना ओढून
वर काढले.’ भाषणाच्या शेवटी ओबीसी बांधवांना भुजबळ यांनी आवाहन केले. ते म्हणाले, ‘हा शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात तुमचे हे मेळावे झाले पाहिजे. आता ही ज्योत तालुक्या तालुक्यात पेटली पाहिजे. निजामशाहीत जर काही पुरावे सापडले कुणबींचे तर आपण द्यायचे की नाही त्यासाठी शिंदे आयोग आहे. एक दिवशी सांगितले 5 हजार सापडले आहेत, पण तेलंगणात निवडणूक आहे, म्हणून करता येत नाही. 2 दिवसात साडेअकरा हजार दाखले कसे झाले? मंत्रिमंडळ बैठक झाली तर साडेतेरा हजार दाखले झाले. एकाला कुणबी सर्टिफिकेट मिळाले की, त्याच्या सर्व नातेवाईकांना ते लावू. लोकांना वर्षानुवर्षे दाखले मिळत नाहीत आणि तुम्हाला पटापट दाखले मिळू लागले. पेनाने कुणबी लिहितात. त्यांनी लिहिले नाही तर कलेक्टर ऑफिसातले अधिकारी लिहून टाकतात कुणबी. शिक्के मारून चुकीचे दाखले दिले जात आहेत. तुमच्या डोळ्यांदेखत आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर जशास तसे उत्तर द्यावे लागेल. गावबंदीचे फलक ताबडतोब हटवा. हे लोकशाहीचे राज्य आहे. दोन चार टाळकी बोर्ड लावतात आणि गावबंदी करतात. सरकार आहे की नाही? सगळे एकवटू पण ही दादागिरी चालू देणार नाही. मला रोज धमक्या येतात. फडणवीसांना शिव्या देतात. भडकावू भाषण करू नका म्हणतात. मी दोन महिने सर्व सहन करतोय. आता मागे हटायचे नाही. शांतपणे उत्तर द्यायचे.’
आमदार गोपीचंद पडळकर या सभेसाठी हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. भुजबळांच्या आधी अन्य नेत्यांची भाषणे झाली. बबनराव तायवाडे म्हणाले की, गेल्या अडीच तीन महिन्यांपासून ओबीसींसाठी संघर्ष सुरू आहे. ओबीसी बांधवांच्या अस्मितेला धोका देण्याचे काम होत आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.
‘भुजबळसाहेब तुम्ही फक्त ताकद द्या, हा ओबीसी समाज गप्प बसणार नाही. ओबीसींचे राज्य आणल्याशिवाय ओबीसी गप्प बसणार नाही,’ असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘भर उन्हात हे पिवळे वादळ आले आहे. अनेकांना पिवळे केल्याशिवाय सोडणार नाही. आम्हाला पद महत्त्वाचे नाही, समाज महत्त्वाचा आहे. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखे वागावे, लहान भावाच्या ताटातले काढायचा प्रयत्न कराल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही. जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी, हे धोरण करावे लागेल. हे केलेत तर दूध का दूध पानी का पानी होईल. ओबीसींच्या एल्गार सभेला येत असताना हा लाखोंचा समुदाय उन्हातान्हाची पर्वा न करता येथे आला आहे. तुम्ही तुमच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आलात. तुमच्या आरक्षणााला कोणी धक्का लावता कामा नये म्हणून तुम्ही आलात. आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. लेकरं लेकरं लेकरं करू नका, इथे काय बकरं बकरं आहेत का कापून खायला? तुमच्या हक्कांची जाणीव झाल्यामुळे आज येथे सर्वपक्षीय नेते
उपस्थित आहेत.’
ओबीसी समाजाचे नेतृत्व करणार्‍या पंकजा मुंडे सभेला अनुपस्थित होत्या. मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच छगन भुजबळ यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. ‘आज मुंडे हयात असते तर ओबीसी बांधवांवर संघर्षाची वेळ आली नसती,’ असे ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांचे छायाचित्र या एल्गार मेळाव्याच्या बॅनरवर लागले होते. मात्र त्या मेळाव्याला अनुपस्थित राहिल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, हा सर्वपक्षीय मेळावा होता. माझे छायाचित्रही बॅनरवर होते, पण प्रत्येक पक्षाच्या वतीने कोणी हजर राहायचे हे ठरले होते. त्यामुळे मी गेले नाही. मला ओबीसींसह मराठा समाजाविषयी देखील सहानुभूती आहे. जातनिहाय गणना व्हायला हवी. जे जन्माने मागास आहेत, त्यांना आरक्षणाचे संरक्षण हवे.

तुमचा बायोडेटा काढला आहे
जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर

’मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. त्यामुळे धमक्या देऊ नयेत, असे प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांना दिले.

कृष्णही यादव म्हणजे ओबीसीच
भुजबळांनी कार्तिकी एकादशीवरून सुरू असलेल्या विरोधावर टीका केली. ते म्हणाले की पंढरपूरला म्हणे अजित पवारांनी यायचे नाही. पंढरपूरच्या देवाला पण जात लागली का? पंढरपूरचा विठ्ठल सर्वांचा आहे. पंढरपूरचा राजा हा कृष्णाचा अवतार. कृष्ण हा यादव कुळाचा. म्हणजे ओबीसी. जातच लावायची झाली तर लावा जात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top