तुमचे मंगळसूत्र काँग्रेस पक्ष मुस्लिमांना देऊन टाकणार जाहिरनाम्यात लिहिले! मोदींच्या वक्तव्याने काँग्रेस संतप्त

बांसवाडा (राजस्थान) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रचार सभेत केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे काँग्रेस पक्ष तर भडकला आहेच, पण राजकारणातही खळबळ माजली आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर ते तुमच्या सर्व संपत्तीची पाहणी करणार आहेत. संपत्तीचा सर्व्हे करून जास्तीची जी संपत्ती असेल ती मुस्लिमांना वाटणार आहे. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यातच म्हटले आहे की, संपत्तीचा सर्व्हे करून त्याचे सर्वांना वाटप केले जाईल. काँग्रेसने याआधीच म्हटले आहे की, देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. आता ते आपल्या भगिनींकडे किती संपत्ती आहे ते बघणार आहेत. आदिवासींकडे किती चांदी आहे ते मोजणार आहेत. सरकार कर्मचार्‍यांचे घर आणि जमीन याची माहिती घेईल. त्यानंतर ही संपत्ती काँग्रेस कुणाला वाटणार आहे? ज्यांना अधिक मुले आहेत त्यांना ही संपत्ती वाटतील. घुसखोरांना संपत्ती वाटली जाईल. तुमच्या मेहनतीच्या संपत्तीचे असे वाटप करणे तुम्हाला मान्य आहे का? आमच्या भगिनींकडे जे सोने असते ती त्यांची संपत्ती असते ती सर्वांच्यात वाटली जाईल. भगिनींचे मंगळसूत्र हे केवळ सोने नसते तर ते त्यांचे जीवन असते. तेही काढून घेऊन वाटले जाईल, संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारला नसतो. पण काँग्रेसचे विचार माओवादी आहेत. काँग्रेस पक्ष हा कम्युनिस्टांच्या कब्जात आहे. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात हे जे सर्व म्हटले आहे ते चिंताजनक आहे. काँग्रेस पक्ष तुमचे मंगळसूत्र खेचून घेण्यापर्यंत पोहोचेल.
पंतप्रधान मोदींच्या या भाषणाने खळबळ माजली. काँग्रेसचे नेते संतप्त झाले. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल, उबाठाचे संजय राऊत, जितेंद्र आव्हाड अशा सर्वांनी मोदींवर सडकून टीका केली. काँग्रेसने म्हटले की, मोदी पूर्ण असत्य बोलत आहेत. आमच्या जाहिरनाम्यात आम्ही अशी वक्तव्ये कुठे केली आहेत ते दाखवावे, मोदींकडे मुद्दे शिल्लक नसल्याने ते आता हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्यासाठी धडधडीत खोटे बोलू लागले आहेत.
उध्दव ठाकरे आज अमरावतीच्या सभेत म्हणाले की, जास्त मुले होतात त्यांना काँग्रेस संपत्ती वाटणार असे मोदी म्हणतात, माझा त्यांना सवाल आहे की, गेली दहा वर्षे तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा कमी मुले असणार्‍यांना संपत्ती का वाटली नाही?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top