तुमच्या माफीनाम्याचा आकार जाहिरातीएवढा मोठा होता का?

रामदेव बाबांना सुप्रीम कोर्टने फटकारले!

नवी दिल्ली

पंतजलीने ६७ वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या माफीनाम्याचा आकार लहान असल्याने योगगुरु रामदेव बाबा यांना सर्वोच्च न्यायलयाने चांगलेच फटकारले. माफीनाम्याचा आकार जाहिरातीएवढा मोठा होता का?, असा प्रश्न न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी उपस्थित केला. या माफीनाम्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी खंडपीठाने कडक शब्दात बाबा रामदेव यांना खडसावले. खंडपीठाने रामदेव आणि बाळकृष्ण यांना तुमची जाहिरात कुठून प्रसिद्ध केली आणि एवढा वेळ का लागला. या जाहिराती एकाच आकाराच्या होत्या, तुम्ही नेहमी एकाच आकाराच्या जाहिराती देता का? अशी विचारणा केली. त्यावर ‘नाही सर, त्याची किंमत खूप जास्त आहे…लाखो रुपये इतकी.आम्ही माफीनामा प्रसिद्ध केला आहे, जाहिरात नाही,’ असे उत्तर बाबा रामदेव यांच्या वकिलाने दिले.

पतंजली प्रकरणात न्यायालय काय म्हणत आहे ते टीव्ही वाहिन्यांवर दाखवले जात असल्याचेही न्यायालयाने म्हटले. ‘पतंजलीची जाहिरातही एका भागात चालवली जात आहे. हे प्रकरण केवळ पतंजलीचे नाही, तर इतर कंपन्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचेही आहे. तुम्हाला जाहिरातीपेक्षा कमाईची जास्त काळजी वाटत नाही का?, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. दरम्यान, पुढील सुनावणी ३० एप्रिलला होणार असून सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top