तुरुंगवास पत्करावा लागला तरी अजिबात माफी मागणार नाही! सुषमा अंधारेंचे नीलम गोऱ्हेंना पत्र

मुंबई- ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रकरणावर अंधारेंनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी अजिबात माफी मागणार नाही, यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल. यासाठी माझी तयारी आहे,’असे अंधारेंनी म्हटले आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे रवींद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा एक व्हिडिओ अंधारेंनी प्रसिद्ध केला होता. धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे तत्काळ अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. त्यानंतर अंधारेंना ८ दिवसांत लेखी दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले होते. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रवीण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या. याबाबत पत्र लिहून अंधारेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
अंधारेंनी पत्रात म्हटले आहे की, ‘विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’ माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात. मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहूत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही, भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top