तुळजापुरात आज बंदची हाक विकास आराखड्यावरून वादंग

सोलापूर :

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरू झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, काही व्यापारी, काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी तुळजापूर शहर बंदचे आवाहन केले आहे.

अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर आक्षेप घेतला जात आहे. याच मुद्द्यांवरून काही पुजारी आक्रमक झाले आहेत. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा, अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. तसेच, दर्शन मंडपाची जागा बदलल्यास काही व्यापाऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे दर्शन मंडपाची जागा बदलण्यास व्यापारी, नागरिकांनी विरोध दर्शवला असून त्याविरोधात उद्या तुळजापूर बंदची हाक दिली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत भाविक, पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांना यावर सूचना करता येतील. १६ व १७ ऑक्टोबरला सूचनांवर चर्चा होईल. २० ऑक्टोबरपर्यंत नागरिक आणि भाविकांनी केलेल्या सूचनांवर तांत्रिक आणि प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतर २६ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top