त्रिपुरात भीषण पूरस्थिती लष्कराकडून मदतकार्य सुरू

आगरतळा – त्रिपुरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून राज्यात लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने दरडी कोसळून आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला.त्रिपुरातील पूरस्थितीचा फटका राज्यातील ६५ हजार लोकांना बसला असून ते सध्या विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या साडेचारशे मदत छावण्यांमध्ये राहात आहेत. भारतीय लष्कराने पुरातून आतापर्यंत ३३० लोकांना सुखरुपपणे वाचवले आहे. राज्य सरकारच्या मदतीला एनडीआरएफ ची ११ पथके, सेनेच्या तीन तुकड्या तसेच वायुसेनेची ४ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. आसाम रायफल्सच्या दोन तुकड्या अमरपूर, भामपूर, बिशलगढ व रामनगर मध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंबरोबरच वैद्यकीय मदतही पुरवण्यात आली. त्रिपुराच्या दक्षिण भागातील गोमती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून या भागातील सर्व सरकारी व खाजगी शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.