दक्षिण भारतात तीव्र पाणीटंचाई केवळ १७ टक्के जलसाठा शिल्लक

चेन्नई- आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश असलेल्या दक्षिण भारतातील जलाशयातील साठवण पातळी सध्या तब्बल १७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे.

पावसासाठी अजून दीड महिना शिल्लक असल्याने या कालावधीत दक्षिण भारतात मोठे जलसंकट उभे राहणार आहे. या राज्यांमधील १७ टक्के ही जलपातळी ऐतिहासिक
सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे की, दक्षिणेकडील प्रदेशात निरीक्षण केलेल्या ४२ जलाशयांची एकूण साठवण क्षमता ५३.३३४ अब्ज घनमीटर आहे. तथापि, या जलाशयांमध्ये एकत्रित साठा सध्या केवळ ८.८६५ अब्ज घनमीटर इतका कमी आहे. म्हणजेच १७ टक्केच पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत दक्षिण भारतातील पाण्याचा साठा २९ टक्के आणि त्याच कालावधीतील दहा वर्षांतील सरासरी पाणीसाठा २३ टक्के इतका होता.

दरम्यान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही भीषण पाणीटंचाई दिसून येत आहे. या दोन्ही राज्यांत सध्याचा पाणीसाठा ११.७७१ अब्ज घनमीटर इतका आहे. हे प्रमाण ४९ जलाशयांच्या ३१.७ टक्के तर १० वर्षांतील सरासरी पाणीसाठा ३२.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top