दहशतवाद्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटीजैशचे मुख्यालयही बांधणार! पाकचे संतापजनक कृत्य


इस्लामाबाद – दहशतवादाला नेहमीच सक्रिय पाठिंबा आणि अर्थपुरवठा करणाऱ्या पाकिस्तानने आता आणखी एक अत्यंत संतापजनक प्रकार केला आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान एकेक कोटी रुपये देणार आहे. भारताच्या संसदेवर हल्ल्याचे नियोजन करणारा कुख्यात दहशतवादी मौलना मसूद अझर याचे कुटुंबातील 10 जण ठार झाले यासाठी 14 कोटी रुपये देण्यात येणार आहे. जखमींनाही लाखोंची भरपाई दिली जाणार आहे. याशिवाय या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालयही पुन्हा उभारून दिले जाणार आहे.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर भारताने याचा बदला घेण्यासाठी 6 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. यात भारतीय सैन्याने क्षेपणास्त्रांने हवाई हल्ले करून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनांच्या दहशतवादी छावण्यांचा समावेश होता. या हल्ल्यात भारताने बहावलपूरमधील मौलना मसूद अझर संस्थापक असलेल्या जैश-ए-मोहम्मद संघटनेचे बहावलपूर मुख्यालयही पूर्णपणे जमीनदोस्त केले. मार्कज सुभान अल्लाह नावाच्या या 15 एकरवर पसरलेल्या मुख्यालयात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. इथे अनेक प्रमुख दहशतवादी वास्तव्यास होते. या मुख्यालयातूनच भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आल्याचा संशय आहे. हे सगळे तळ उद्धवस्त केल्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले. तर पाकिस्तान सरकारची पुरती लाज गेली. त्याची भरपाई करण्यासाठी आता पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना घसघशीत भरपाई आणि उद्ध्वस्त झालेल्या दहशतवादी अड्ड्यांचे पुर्नवसन करण्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे की, भारताच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल. जखमींना 10 लाख ते 20 लाख पाकिस्तानी रुपये दिले जातील. भारताने केलेल्या हल्ल्यात मौलना मसूद अझरच्या कुटुंबातील 10 जण मारले गेले होते. शिवाय त्याच्या 4 सहकाऱ्यांचादेखील खात्मा झाला होता. 14 जवळच्या व्यक्ती मारल्या गेल्याने पाकिस्तान सरकार मसूद अझरला 14 कोटी रुपये देणार आहे. याशिवाय या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयही पुन्हा उभारणार आहे. भारताच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी घर बांधणे आणि त्यांच्या मुलांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार ही जबाबदारी पार पाडेल, असे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
भारतीय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाक लष्कराच्या जवानांच्या कुटुंबीयांना 1 ते 1.8 कोटी पाकिस्तानी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदानुसार भरपाई दिली जाईल आणि त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण वेतन आणि निर्वाह भत्ताही दिला जाणार आहे. पाकिस्तान सरकार सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलेल आणि प्रत्येक सैनिकाच्या एका मुलीच्या लग्नासाठी 10 लाख पाकिस्तानी रुपये आर्थिक मदत म्हणून देईल. जखमी सैनिकांना 20 ते 50 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तीदेखील सैनिकांच्या दर्जाच्या आधारावर दिली जाईल. ज्या सैनिकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरांसाठी 1.9 ते 4.2 कोटी रुपये दिले जातील.
बलुचिस्तानचे संयुक्त राष्ट्राला पत्र
भारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांनी पाठिंबा देणार्या पाकिस्तानला त्यांच्याच देशातील बलुचिस्तान प्रांताकडून करावे तसे भरावे असा धडा मिळत आहे. बलुचिस्तान प्रांताने संयुक्त राष्ट्र महासचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की, पाकिस्तान या दहशतवादी राष्ट्राचा अंत जवळ आला आहे. संयुक्त राष्ट्रांनी बलुचिस्तानला स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून मान्यता द्यावी, सदस्य देशांची तातडीची बैठक बोलवावी. बलुचिस्तानमध्ये शांतता दल पाठवावे. पाकिस्तान सैन्याने तात्काळ माघार घ्यावी. नव्या राष्ट्रासाठी चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अब्जावधी रुपये निधीची तरतूद करण्यात यावी.