दादरच्या फलाट क्रमांकात आजपासून नवे बदल होणार

मुंबई

दादर रेल्वे स्थानकातील मध्य रेल्वेवरील सर्व फलाट क्रमांकांमध्ये उद्यापासून बदल होणार आहेत. दादर हे मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील सर्वात गर्दीचे स्थानक आहे. दादरवरून पश्चिम व मध्य अशा दोन्ही रेल्वे सुटतात. त्यामुळे दादरहून अनेक प्रवासी रोज प्रवास करतात मात्र, मध्य रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा गोंधळ उडतो. याच पार्श्वभूमीवर येथील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

दादर रेल्वे स्थानकात सध्या पश्चिम व मध्य रेल्वेचे असे एकूण १४ फलाट आहेत. मध्य रेल्वेवरील १ ते ७ क्रमांकांवरील फलाटांचे क्रमांक आता ८ ते १४ असे असतील, तर पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांचे क्रमांक आहेत तसेच राहतील. याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवाशांना प्रवास करताना स्पष्टता यावी म्हणून हे बदल केले आहेत. दादर हे मोठे जंक्शन आहे. तेथे पश्चिम रेल्वेच्या रोज १०५० गाड्या, तर मध्य रेल्वेच्या ९०० गाड्या थांबतात. क्रमांक बदलाचे काम आज मध्यरात्री पूर्ण होईल. नवीन फलाट क्रमांक हे उद्यापासून सुरू होतील. प्रवाशांना समजण्यासाठी डिस्प्ले बोर्ड महत्त्वाच्या ठिकाणी लावले जातील. पश्चिम रेल्वेच्या भागात मध्य रेल्वेच्या फलाटांची सूचना दिली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top