दिल्लीच्या बाबर रोडवरील अयोध्या मार्गाचे स्टिकर

  • रस्त्याचे नाव बदलण्याची हिंदू सेनेची मागणी

नवी दिल्ली

नवी दिल्लीतील बाबर रोडच्या फलकावर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी अयोध्या मार्ग असे नाव असलेले स्टिकर लावले आहे. बाबर रोडसह अन्य मुघल शासकांशी संबंधित रस्त्यांची नावे बदलण्यात यावी, अशी मागणी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यासाठीच हे स्टिकर लावण्यात आले.

हिंदू सेनेचे म्हणणे आहे की, ‘हा देश प्रभू रामांचा आहे. त्यामुळे मुघल शासकांशी संबंधित रस्त्यांची नावे बदलली पाहिजेत. बाबर रोडचे नाव बदलून अयोध्या मार्ग असे करण्यात यावे. भारत हा भगवान राम, भगवान कृष्ण, वाल्मिकी आणि गुरु रविदास यांचा देश आहे. अयोध्येत प्रभू रामांचे मंदिर बांधले आहे. सोमवारी या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. बाबरची बाबरीच राहिली नाही तर दिल्लीमध्ये बाबर रोड तरी कशाला हवा?’ याबाबत नवी दिल्ली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित स्टिकर हटवण्यात आले आहे’.

हिंदू सेनेची ही मागणी अनेक वर्षांपासून असल्याचे सांगितले जात आहे. हिंदू सेनेच्या या कृत्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी हिंदू सेनेने समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ दिल्लीत अनेक ठिकाणी पोस्टर चिकटवली होती. त्याची जबाबदारीही हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी घेतली होती. आतापुन्हा दिल्लीतील बाबर रोडच्या बोर्डवर अयोध्या मार्गाचे स्टिकर चिकटवण्यात आले असून याची जबाबदारीही हिंदू सेनेने घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top