दूधदराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ! दूध उत्पादक आंदोलनाच्या तयारीत

मुंबई : दूधदराबाबत आज सरकारने बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. सरकारने दूध दराबाबत काढलेला आदेश मान्य करण्यास दूध कंपन्यांनी नकार दिल्याची माहिती शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे शेतकरी संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपण सर्वांची भूमिका ऐकून घेतली आहे. सर्वांनी संयम बाळगला पाहिजे असे म्हटले आहे. बैठकीनंतर आक्रमक झालेल्या दूध उत्पादक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर शासकीय आदेशाची होळी करत संताप व्यक्त केला.

दूधदर प्रश्नी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी २. ३० वाजण्याच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृह येथे दूध संघ, दूध कंपन्या आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. ही बैठक निष्फळ ठरली असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला.
राज्य सरकारने आज स्वतःहून पुढाकार घेऊन सगळ्या दूध उत्पादक, शेतकऱ्यांना, संघटना यांची भेट घेतली असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले. आजच्या बैठकीत आम्ही सर्वांची भूमिका जाणून घेतली. मध्यंतरी सरकारने पुढाकार घेऊन ३४ रुपये दर जाहीर करत शासकीय आदेश काढला होता. काही दूध संघांनी भाव कमी केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुधात भेसळीच प्रमाण वाढत चाललं आहे ही चिंतेची बाब आहे. दुधाची भेसळ कमी होईल, आणि भाव वाढण्यात मदत होईल, असे प्रतिपादन विखे-पाटील यांनी केले. मी सर्वांची भूमिका एकूण घेतली आहे. निर्यातीला आपण जो पर्यंत प्रोत्साहन देत नाही तो पर्यंत पर्याय मिळणार नाही. यावर मार्ग काही तरी काढावा लागेल. पुन्हा बैठक बोलवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top