देवेंद्र फडणवीसांना चपराक खडसे भाजपात परतणार

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करत ऑक्टोबर 2020 मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले आमदार एकनाथ खडसे साडेतीन वर्षांनंतर पुन्हा ‘कमळ’ हाती घेणार आहेत. आठवडाभरात स्वगृही परतत असल्याचे खुद्द खडसे यांनीच ‘नवाकाळ’ला सांगितले. भाजपात परतल्यावर त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती होणार आहे, असे सांगितले जात आहे. खडसेंची घरवापसी ही राज्यात भाजपाचे सर्वात पॉवरफुल नेते असलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ही एक चपराक असल्याचे बोलले जात आहे. आपल्या भाजपात पुनर्प्रवेशाची माहिती देताना सांगितले की, मी स्वगृही परतत आहे. पक्षाच्या पायाभरणीपासून ते घर उभे करण्यापर्यंत माझे पक्षासाठी योगदान आहे. काही कारणास्तव नाराज होऊन गेलो होतो. पण आता नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे हा माझा प्रवेश नसून मी घरातच परत येत आहे. पुढील पंधरा दिवसांत हा प्रवेश होईल, असा माझा प्रयत्न आहे.
भाजपाचे सहा वेळा आमदार असलेले एकनाथ खडसे हे पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी-विक्रीचा आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदा यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याच्या जावयाला अटकदेखील झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटका केल्यानंतर दोन वर्षांनी ते जामिनावर बाहेर आले. तर सर्वोच्च न्यायालयात खडसे यांच्याविरुद्धचा खटला अजूनही सुरू आहे. खडसेंच्या पीएलाही मंत्रालयातच लाच घेतल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली होती. नंतर या प्रकरणात त्याला क्लीनचिट देण्यात आली होती. खडसे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा फोन आल्याचे प्रकरणही याच काळात बाहेर आले होते. खडसेंवर एकामागोएक आरोप करण्यात आले होते. हे सर्व फडणवीस यांनी घडवून आणले, असा खडसेंचा आरोप होता. यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. फडणवीस यांनी विरोधकांचा काटा काढला. आता साडेतीन वर्षांतच खडसे यांचे भाजपात परतणे, ही फडणवीस यांना चपराकच मानली जात आहे.
आठवडाभरापूर्वी खडसे यांनी दिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे बोलले जात होते. दोन दिवसांपूर्वीच खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी मुंबईला खासदार शरद पवारांच्या भेटीला गेले होते. परंतु त्यांची भेट होऊ शकली नव्हती. दरम्यान त्यांनी जयंत पाटील यांना आपण राष्ट्रवादीमधून बाहेर पडत असल्याबाबत कळवले असल्याचे खडसे यांनी सांगितले.
खडसे यांच्या भाजपा प्रवेशावर विविध पक्षांतील नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रवेशासाठी आमची राज्य आणि केंद्रीय समिती आहे. ती याबाबत निर्णय घेईल. परंतु भारताच्या विकासासाठी खडसे भाजपात आले, तर त्यांचे स्वागतच आहे. आम्ही कुणी काही म्हणत नाही. खडसे भाजपात आले तर सर्वात जास्त आनंद देवेंद्र फडणवीसांनाच होईल. तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, खडसे यांच्या मनात मध्यंतरी चलबिचल होती. परंतु आता त्यांना योग्य वाटतो तो निर्णय ते घेतील. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, खडसे हे स्वाभिमानी नेते आहेत. भाजपात त्यांचा छळ झाला होता. हे त्यांनीच सांगितले होते. त्यांना वाईट ट्रीटमेंट दिली. त्यांच्या जावयाला तुरुंगात टाकले. त्यांनाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. ते भाजपात परत जाणार नाहीत, असे
मला वाटते.
भाजपात परतल्यावर खडसे यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आपण भविष्यात निवडणूक लढवणार की राज्यपाल म्हणून आपली नियुक्ती होणार, हे अजून स्पष्ट नसल्याचे खडसे म्हणाले. मात्र, ते पुन्हा भाजपामध्ये जाणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलणार आहेत. या भागात भाजपा पुन्हा एकदा मजबूत स्थितीत येणार असल्याचे बोलले जात आहे.

रोहिणी खडसे राष्ट्रवादीतच राहणार
भाजपा सोडताना त्यांच्यासोबत असलेल्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र तूर्त राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत आपण राष्ट्रवादीतच आहोत व भविष्यातही राहू, असे म्हटले आहे. त्यामुळे रोहिणी आपल्या वडिलांसोबत भाजपात जाणार नाहीत, हे निश्‍चित झाले आहे. आता खडसे व त्यांची सून रक्षा भाजपात, तर मुलगी रोहिणी राष्ट्रवादीत असे चित्र असेल. पत्नी मंदा यांची भूमिका जाहीर झालेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top