देशभक्त 88 कोण? तृणमूल आमदारासह फोटो आरोपी ललित झाची कबुली! मीच सूत्रधार

नवी दिल्ली – संसद सुरक्षा भंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काल रात्री पाचवा आरोपी ललित झा याला अटक केली. संसद सभागृहातल्या घुसखोरीच्या कटाचा प्रमुख सूत्रधार आपणच असल्याची कबुली झा याने दिली. ‘देशभक्त 88’ या नावाने इन्स्टाग्रामवर हे आरोपी संपर्कात होते. हा देशभक्त 88 कोण? याचा शोध सुरू आहे. ललित झा आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार तापस रॉय यांचे एक छायाचित्र भाजपने उघड केले आहे. भाजपने तृणमूल, काँग्रेस आणि मार्क्सवादींवर आरोप सुरू केले आहेत. भाजप आणि तृणमूलमध्ये आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.
संसद सुरक्षा भंग प्रकरणातील पाचवा आरोपी ललित झा याला गुरुवारी सायंकाळी दिल्लीतून अटक केली. झा याला आज पतियाळा कोर्टात हजर केले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तोच संसदेतील घुसखोरीच्या कटाचा प्रमुख सूत्रधार आहे. तशी कबुली त्याने दिली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी न्यायालयात दिली. झा याच्याकडे अन्य आरोपींचे मोबाईल होते. जेव्हा चारपैकी दोन आरोपींना संसदेबाहेर धुराची नळकांडी फोडताना अटक झाली तेव्हा ललित झाने त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर तो पसार झाला आणि त्याने सर्वांचे मोबाईल नष्ट केले. ललित राजस्थानला गेला, तिथे त्याचा चुलत भाऊ महेशने त्याला रुम दिली. महेश आणि कैलाश यांना अटक केली आहे. गेली दोन वर्षे संसदेत घुसण्याचा कट रचला जात होता. आधी ‘देशभक्त 88’ वरून एकेकाशी संपर्क साधण्यात आला. मग स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला, अशी माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलिसांचे पथक चहू दिशेला शोध घेत आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आजही विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे होऊ शकले नाही. संसद सुरक्षा भंग प्रकरणी आजही विरोधक आक्रमक होते. परिणामी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
भाजपने संसदेतील तरुणांच्या घुसखोरीत तृणमूल, सीपीआय आणि काँग्रेस कनेक्शन शोधले आहे. 32 वर्षीय झा याने 23 फेब्रुवारी 2020 रोजी आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून रॉय यांच्यासह सरस्वती पूजा कार्यक्रमात घेतलेले छायाचित्र पोस्ट केले होते. भाजपचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन ललित झा आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार राज्यमंत्री तापस रॉय यांच्यासोबतचे हे छायाचित्र दाखवत दोघांचा संबंध असल्याचे आरोप केले. भाजपा आता या आरोपींचे तृणमूल, सीपीआय, काँग्रेसशी संबंध असल्याचे आरोप करत आहे. भाजपचे पश्चिम बंगाल अध्यक्ष सुकांत मझुमदार यांनी एक्स वर लिहिले की, आपल्या लोकशाहीच्या मंदिरावरील हल्ल्याचा सूत्रधार ललित झा हा दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसचे तापस रॉय यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून आहे. रॉय यांच्या चौकशीसाठी हा पुरेसा पुरावा नव्हे का? भाजपचे आयटी सेलचे राष्ट्रीय प्रभारी अमित मालवीय यांनी म्हटले की, ललित झाचे तृणमूल कनेक्शन समोर आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनेक छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. आता संपूर्ण प्रकरणात सहभागी आरोपींचे काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि आता तृणमूल काँग्रेस सोबत संबंध असल्याचे पुढे येत आहे. हताश झालेल्या इंडिया आघाडीने केंद्र सरकारला कमजोर करण्यासाठी भारतीय संसदेवर हल्ला केला आहे का? संसद 140 कोटी भारतीयांचा आवाज आहे. लाज वाटायला हवी.
याच्या उत्तरादाखल रॉय यांनी सांगितले की, सोशल मीडिया पोस्टला महत्त्व नाही. माझे खूप समर्थक आहेत. चौकशी होऊ द्या, चौकशीत काही सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत. अनेक जण छायाचित्रे घेत असतात. मी ललितला ओळखत नाही. संसद सुरक्षेचा भंग हे एक गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याऐवजी चौकशी करा. तृणमूलचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली की, भाजपा खासदार प्रताप सिंह यांच्या पासवर आरोपी आले होते. संसदेच्या सुरक्षेसाठी 300 ऐवजी केवळ 176 दिल्ली पोलीस कर्तव्यावर होते. विरोधी पक्ष या बेजबाबदारपणाबद्दल गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजप असले बेछूट आरोप करत आहे.

अमोल शिंदेंच्या पालकांचा
आत्महत्येचा इशारा

लातूर – संसदेचे अधिवेशन सुरू असताना संसद आणि संसदेच्या बाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी लातूरचा अमोल शिंदे सध्या अटकेत आहे. अमोलशी आमचे बोलणे करून द्या अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असा इशारा अमोलच्या आईवडिलांनी दिला आहे. अमोल शिंदेच्या आईवडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, अमोलने दिल्लीला जाण्याआधी विहीर खोदण्याचे काम केले. त्यातून पाच हजार रुपये मजुरी मिळवली. दोन हजार उसणे घेतले आणि ते घेऊन तो 9 तारखेला दिल्लीसाठी निघाला होता. दोन दिवस मजूर म्हणून काम करून लातूरला गेला. तिथे जाऊन भगतसिंह यांचा फोटो विकत घेतला होता. भगत सिंह आणि इतरांचे फोटो असलेला बनियन विकत घेतले. तेच घालून तो संसदेत गेला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top