द.कोरियातील विरोधी पक्षनेत्यावर माध्यमांसमोरच चाकूने हल्ला

सेऊल

दक्षिण कोरियामध्ये विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. बुसान येथे त्यांच्या पक्षाची पत्रकार परिषद सुरू असताना माध्यमांसमोरच एका अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात त्यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला जखम झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर हल्लेखोराला तात्काळ अटक करण्यात आली. २०२२ साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फारच थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता.

बुसान येथील आपत्कालीन कार्यालयाने सांगितले की, ली जे-म्युंग यांनी बुसान शहरातील नवीन विमानतळाच्या बांधकामाला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ५० ते ६० वर्ष वयोगटातील हल्लेखोर ली यांची स्वाक्षरी मागण्याच्या निमित्ताने त्यांच्या जवळ आला आणि त्याने चाकूने वार करण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वार केल्यानंतर ली जमिनीवर पडले. ली यांच्या आजूबाजूच्या लोकांनी हल्लेखोराला पकडले.

दरम्यान, ली हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरियाचे नेते आहेत. ते सध्या दक्षिण कोरियाच्या विधानसभेचे सदस्य नाहीत, परंतु एप्रिल २०२४ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते एका जागेसाठी उभे राहण्याची शक्यता आहे. ते २०२२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष यून सुक-योल यांच्याकडून केवळ ०.७३ टक्के मतांच्या फरकाने पराभूत झाले. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील राष्ट्राध्यक्षपदाची ही आजवरची सर्वात चुरशीची लढत होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top