नवाझ शरीफ यांना मोठा दिलासा! जप्त मालमत्ता परत मिळणार !

इस्लामाबाद – इस्लामाबादच्या उत्तरदायित्व न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तात्पुरता का होईना मोठा दिलासा दिला आहे. २०२० मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जप्त केलेली त्यांची सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता परत करण्याचे आदेश उत्तरदायित्व न्यायालयाने दिले आहेत.
इस्लामाबाद उत्तरदायित्व न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी जप्त मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले.७३ वर्षांचे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे नेते शरीफ यांच्या विरोधातील तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणाची उत्तरदायित्व न्यायालयात सुनावणी झाली.नवाझ शरीफ २१ ऑक्टोबरला साडेचार वर्षांच्या आत्मनिर्वासानंतर मायदेशी परतले आहेत. नवाझ शरीफ यांचे वकील मिसबहुल हसन काझी यांनी न्यायाधीश बशीर यांना माहिती देताना सांगितले की, शरीफ यांनी आत्मसमर्पण केले असल्याने आणि त्यांच्या अटकेसाठी जारी केलेले वॉरंट रद्द करण्यात आल्याने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश मागे घेतला जाऊ शकतो. तोशाखाना प्रकरणात गुन्हेगार घोषित झाल्यानंतर, २०२० मध्ये तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांची शेतजमीन, मर्सिडीज बेंझ कार, लँड क्रूझर कार आणि इतर वाहने जप्त करण्यात आली होती.गेल्या महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानात परतल्यानंतर नवाझ शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत. पाकिस्तानमधील राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. सोमवारी नवाझ शरीफ यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीशी संबंधित तयारी करण्याचे निर्देश दिले होते. पीएमएल-एनने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पक्षाचा निवडणूक प्रचार नव्या टप्प्यात दाखल झाला आहे आणि नवाझ शरीफ पक्षाच्या सदस्यांसोबत त्यांच्या बैठका घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top