नवाब मलिक दाऊदचे, प्रफुल्ल पटेल मिर्चीचे एकमेकांवर आरोप केले आणि सत्तेला चिकटून बसले

मुंबई – एकेकाळी तुमचा दाऊद तर आमचा गवळी, असे जाहीर बोलले जात होते. आता आमचा नवाब मलिक तर तुमचा प्रफुल्ल पटेल, असा भयंकर आरोप एकमेकांवर जाहीरपणे करून नंतर सर्व पक्ष गोलमाल उत्तर देत काहीच न झाल्यासारखे आपापल्या खुर्च्यांना चिकटून बसले आहेत. नवाब मलिकांचा दाऊद या देशद्रोह्याशी संबंध असल्याने ते युतीत नको, असा पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तसे पत्र अजित पवारांना लिहून ते पत्र जाणीवपूर्वक उघड केले. त्यावर आज उबाठा नेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना सवाल केला की, तुम्हाला दाऊदशी संबंध म्हणून मलिक चालत नाहीत, मग दाऊदचा हस्तक मिर्चीशी संबंध असलेले प्रफुल्ल पटेल कसे चालतात? यावर फडणवीस, अजित पवार आणि शिंदे गट यांनी काहीही उत्तर दिले नाही.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या बाकावर बसले आणि सत्ताधारी पक्षातील घटकांमध्ये वादाची ठिणगी पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटाला जाहीर पत्र लिहून नवाब मलिक यांना विरोध केला. आज या वादात अजित पवार गटाचे खा. प्रफुल्ल पटेल यांचेही नाव आले. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीबरोबरच्या संबंधांबाबतचा मुद्दा उबाठा गटाने उपस्थित करून फडणवीस यांची कोंडी केली. दाऊद यांच्याशी संबंध ठेवल्याने मलिक चालत नाहीत, मग मिर्चीशी संबंध असलेले पटेल कसे चालतात, असा सवाल विरोधकांनी केला.
नवाब मलिक यांना सत्ताधारी बाकांवर कसे बसू देता, असा प्रश्न काल फडणवीस यांनी विचारल्यानंतर आज खा. प्रफुल्ल पटेल यांच्यावरून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. दाऊदचा हस्तक आणि 1993 च्या बॉम्बस्फोटांचा आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचे प्रफुल्ल पटेलांवरील आरोप जुनेच आहेत. मुंबईच्या वरळी भागातील सीजे हाऊस या प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीच्या मालकीच्या इमारतीच्या विकासावरून ईडी (अंमलबजावणी संचालनालय)ने 21 जुलै 2022 रोजी कारवाई करून पटेल यांच्याशी संबंधित अनेक मालमत्ता जप्तही केल्या होत्या. ईडीच्या चौकशीतून मिर्ची याची पत्नी हजरा आणि पटेल यांची पत्नी वर्षा प्रवर्तक असलेल्या मिलेनिअम डेव्हलपर्स या कंपनीत झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आली होती. वरळीतील एका मालमत्तेचा पुनर्विकास करून पटेल यांच्या कंपनीने 2007 मध्ये सीजे हाऊस ही 15 मजली इमारत उभारली. ही जागा मूळ मिर्चीच्या मालकीची असल्याने त्याची पत्नी हजरा हिला इमारतीत तीन मजल्यांवरील 16 हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात आल्याचे उघड झाले होते. पटेल यांनी मिर्चीचे निकटवर्तीय व नातेवाईकांना 22 कोटी रुपये, 7 सदनिका दिल्याचा आरोप झाला होता. ईडीने 2019 ते 2023 दरम्यान कारवाई करीत सीजे हाऊस मधील या सदनिका, एक चित्रपटगृह, हॉटेल, पाचगणी येथील एक हॉटेल, दोन बंगले आणि साडेतीन एकर जमीन एवढ्या मालमत्तेवर टाच आणली होती. त्यानंतर मलिक यांच्यावर देशद्रोही मिर्चीशी संबंध असल्याचे आरोप फडणवीस यांच्यापासून अमित शहांपर्यंत भाजप नेत्यांनी केला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटेल यांच्याविरोधात मोर्चा काढून निदर्शनेही केली होती. केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल मंत्री असताना याच मुद्यावर भाजपाने सोनिया गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, काल नवाब मलिक यांना विरोध करताना भाजपला आता सत्ताधारी अजित पवार गटात असलेले खासदार प्रफुल्ल पटेल आठवले नाहीत. त्यामुळे फडणवीस यांनी मलिक यांच्याबाबत अजित पवार यांना पत्र लिहिल्यानंतर आज उबाठा गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पटेल यांचीही आठवण करून दिली.
या पत्रात दानवे म्हणतात, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे राष्ट्रद्रोह्याशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्यास आपण विरोध केला. नैतिकता आणि राष्ट्रवाद याबाबत आपण किती पक्के आहात, हेच यातून दिसते. पण, अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ’ईडी’ने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी आशा बाळगतो.
अंबादास दानवे असेही म्हणाले की,फडणवीस याबद्दल फोन करून अजित पवार यांच्याकडे विचारणा करू शकले असते. परंतु तसे न करता त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवले, नव्हे तर ट्वीट केले. त्यावरून ट्रिपल इंजिन सरकारमध्ये काही तरी बिघडलेले आहे, हे स्पष्ट होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अजित पवारांना लिहिलेले पत्र शेअर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप
निर्दोष ठरवलेले नाही. त्यामुळे आमचाही त्यांना विरोध आहे . सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील मलिक यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे. अजित पवार जनहिताचा आणि लोकभावनेचा आदर करूनच योग्य तो निर्णय घेतील. या विषयावरून विरोधकांनी नाकाने कांदे सोलायची गरज नाही, त्यांना तो अधिकारही नाही. नवाब मलिक तुरुंगात असताना ते मविआ सरकारमध्ये मंत्रिपदावर होते. त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांना या मुद्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत शिंदे गट काहीही बोलायला तयार नाही. प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करून दाखवा, असे सुनील प्रभू यांनी म्हणताच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मलिक यांच्यावर कारवाई का केली नाही असा उलट सवाल शिंदे गटाचे गोगावले यांनी केला . मलिक यांच्याबद्दल अजित पवार गटाला विचारले तेव्हा मलिक यांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही , त्यांनी भूमिका जाहीर केल्यावर बघू असे उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिले . त्यांच्यावर कारवाईच्या मागणी बाबत विचारले तेव्हा विरोधक वैफल्यग्रस्त आहे असे उत्तर त्यांनी दिले . स्वतः अजित पवार यावर कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत , फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे प्रफुल्ल पटेल यांच्या बद्दल प्रतिक्रिया देत नाहीत असा सर्व खेळ आज सुरू होता .
देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर बॉम्बनंतर आता भाजप नेतेही आमदार नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत आहेत. मोहित कंबोज म्हणाले की, ’मिया नवाब मलिक यांचा जामीन
सर्वोच्च न्यायालयाने रद्द करावा. उपचारांसाठी जामीन, अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नाही. कचरा सेठची तब्येत ठणठणीत आहे, असे पाहून वाटते की, त्यांना कोणत्याही उपचारांची गरज वाटत नाही. त्यांना पुन्हा तातडीने आर्थर रोड जेलमध्ये पाठवावे.
इक्बालची पत्नी हजरा पूर्वीची सिनेअभिनेत्री
ईडीने केलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या चौकशीत इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा हिचे नावही पुढे आले होते. हजरा ही मिर्चीची दुसरी पत्नी होती. तिचे मूळ नाव हिना कौसर असे आहे. ’मुघले आझम’ चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते के. आसिफ यांची मुलगी असलेली हिना ही सिनेअभिनेत्री होती. तिने ’पाकिजा’, ‘रझिया सुलतान’ सारख्या 50 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. तिने 1991 मध्ये मिर्चीशी लग्न केले. मिर्चीच्या मृत्यूनंतर ती लंडनमध्ये राहात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top