नवी मुंबईतील ६५ वर्षांवरील नागरिकांना मोफत बस प्रवास

नवी मुंबई- नवी मुंबईतील ६५ वर्षांवरील नागरिकांना आता पालिकेच्या परिवहन विभागाने एनएमएमटी बसमधून मोफत प्रवास सुविधा उपलब्ध केली आहे. उद्या सोमवार १३ नोव्हेंबरपासून ही मोफत बसप्रवास सुविधा प्रत्यक्ष सुरू होणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.
हा मोफत प्रवास करण्यासाठी ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र घेणे गरजेचे आहे. या ओळखपत्राकरिता वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून जन्मतारखेचा दाखला अथवा पूर्ण जन्मतारीख नमूद असलेले आधार कार्ड सादर करणे आवश्यक असेल. तसेच नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवास पुरावा म्हणून मालमत्ताकर त्या ज्येष्ठ नागरिकाच्या स्वत:च्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर असलेले कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. भाडेपट्टीवर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी घराचा करारनामा किंवा नवी मुंबई पालिका हद्दीमध्ये किमान पाच वर्षे रहिवाशी असल्याचा तहसिलदाराचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. अशा सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त करून घेता येईल.त्याकरिता कागदपत्राच्या मूळ व दोन छायांकीत प्रती तसेच पासपोर्ट आकारचे तीन फोटो सादर करणे आवश्यक राहील.
दरम्यान,नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील २०५ डिझेलवर चालणा-या, ८५ सीएनजीवर चालणा-या तसेच ५६ वातानुकूलीत व्होल्वो आणि १९५ वातानुकूलीत इलेक्ट्रीक अशा एकूण ५४१ बसेस आहेत. ही बससेवा नवी मुंबई पालिका हद्दीत व हद्दीबाहेर मुंबई,बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर,पनवेल,खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात ४३ सर्वसाधारण व ३२ वातानुकुलीत अशा एकूण ७५ बस मार्गांवर सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top