नव्या वर्षात इस्रोचा नवा इतिहास आदित्य आपल्या कक्षेत पोहोचले

बंगळुरू- नव्या वर्षात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षीच्या चांद्रयान मोहिमेच्या उत्तुंग यशानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आलेली आदित्य एल-वन ही पहिलीवहिली मोहीम आज यशस्वी झाली. आदित्य एल-वनने आपल्या नियोजित ‘हॅलो ऑर्बिट’मध्ये प्रवेश केला. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यानच्या लाग्रांज पॉईंट-वन सभोवतालच्या हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल-वन प्रस्थापित करणे, ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक कामगिरी इस्रोने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून संपूर्ण अंतराळ विश्वात आपले स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली असून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.
तब्बल 120 दिवसांचा प्रवास करून आदित्य एल-वन शुक्रवारी लाग्रांज पॉईंट-1 च्या जवळ पोहोचले होते.या 120 दिवसांच्या प्रवासात आदित्यने पृथ्वीभोवती चार प्रदक्षिणा घातल्या होत्या. लाग्रांज पॉईंटनजीक पोहोचल्यानंतर या बिंदू भोवतालच्या हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल-वन प्रस्थापित करणे ही कामगिरी अत्यंत खडतर आणि गुंतागुंतीची होती. ती फत्ते झाल्याने आता आदित्य एल-वन या कक्षेतून सूर्याभोवती फिरून सूर्याचा अभ्यास करणार आहे. या अभ्यास मोहिमेचा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. पृथ्वीवरून सूर्याचे निरीक्षण किंवा सूर्याच्या पृष्ठभागावर सातत्याने होणार्‍या घडामोडींचा अभ्यास करताना ज्या अडचणी येतात, त्या हॅलो कक्षेतून निरीक्षण केल्याने दूर होणार आहेत. त्यामुळे सूर्याबद्दल आजवर आपल्या ज्ञात नसलेली रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे.
आदित्य एल-वनच्या यशाबद्दल माहिती देताना ‘आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्व्हेशनल सायन्सेस’ या नैनिताल स्थित संस्थेचे संचालक प्राध्यापक दीपांकर बॅनर्जी यांनी सांगितले की, आदित्य एल-वनने हॅलो कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला, ही संपूर्ण खगोल विश्वासाठी अभिमानाची बाब आहे.इस्रोने सूर्याला गवसणी घालण्यासाठी घेतलेली ही उत्तुंग भरारीच आहे. आता सूर्याचे पृथ्वीच्या तुलनेने अगदी जवळून निरीक्षण करण्याची आणि सूर्याचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. आदित्य एल-वनवर असलेल्या सात उपकरणांपैकी ‘सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (एसयूईटी) ही शक्तिशाली दुर्बिण आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आली आहे.
या अंतराळ सिद्धीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून जगाला याची माहिती होती.या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताचे पहिले सूर्यनिरिक्षक यान आदित्य एल-वन आपल्या मुक्कामस्थळी पोहोचले. आपल्या वैज्ञानिकांच्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्याच्या अथक समर्पणाचा हा पुरावा आहे. या विलक्षण पराक्रमाच्या कौतुक सोहळ्यात मीदेखील देशवासियांसोबत आहे. आम्ही मानवतेच्या हितासाठी अशा वैज्ञानिक मोहिमांचा पाठपुरावा करत राहू.

’हॅलो ऑर्बिट’चे वैशिष्ट्य काय?
आदित्य एल-वनच्या यशानंतर भारतीयांमध्ये हॅलो ऑर्बिटबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. त्या अनुषंगाने माहिती देताना बॅनर्जी यांनी सांगितले की, पृथ्वीची निम्न कक्षा ही 2,000 किमी उंचीवर आहे. या कक्षेत सामान्यतः उपग्रह प्रस्थापित केले जातात. कक्षा लहान असल्याने उपग्रह एका दिवसांत पृथ्वीभोवती अनेक प्रदक्षिणा घालू शकतात. मात्र हॅलो कक्षा ही लोअर अर्थ ऑर्बिटहून कितीतरी पटीने मोठी असल्याने या कक्षेत एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी उपग्रहांना कित्येक महिन्यांचा कालावधी लागतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top