नांदगावात पाण्यावरून महिलांचा रास्ता रोको

नांदगाव – तब्बल २० दिवस उलटूनही नगरपरिषदेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा करण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातीलनांदगाव येथील कैलासनगरच्या महिलांनी रास्ता-रोको आंदोलन केले. हातात रिकामे हांडे घेवून ते वाजवत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरूध्द जोरदार घोषणाबाजी केली. गिरणा धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने पाणी सोडण्यास विलंब झाल्याचे कारण देत सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन नगरपरिषदेने दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी नांदगाव-संभाजीनगर रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नांदगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. लेंडी नदीपात्रात नव्या पुलाचे काम सुरु असताना शहराला पाणीपुरवठा करणारी चारशे एमएमची मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे गेल्या २० दिवसांपासून नांदगावसह सतरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणाने तळ गाठले आहे. सध्या माणिकपुंज धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top