नागपूरचे जेष्ठ उद्योगपुरुष हरगोविंद बजाज यांचे निधन

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योगपुरुष आणि बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक हरगोविंद गंगाबिसन बजाज यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गायत्रीदेवी बजाज, मुलगा रोहित व सुनील बजाज, तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे.

हरगोविंद बजाज यांची अंत्ययात्रा आज सकाळी १० वाजता त्यांच्या ‘साकेत,’ या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर पोहचली. त्यानंतर तिथे त्यांच्या पार्थिवावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.हरगोविंद बजाज यांचे नागपूरसह विदर्भात औद्योगिकीकरणाला चालना देण्यात महत्त्वाचे योगदान आहे.विदर्भात उद्योगांच्या स्थापनेचे स्वप्न त्यांनी बघितले व विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष असताना ते कार्य पूर्ण करण्यास सामर्थ्य पणाला लावले. ते एक कुशल व्यावसायिक होते. त्यांनी विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्न केले. ते प्रमुख राष्ट्रीय प्लास्टिक संघटनेत सक्रिय होते. त्यांचे प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

स्टील चेंबरचे संस्थापक सदस्य असलेल्या बजाज यांनी आपल्या नैतिक मूल्यांवर विशेष लक्ष दिले होते.ते हुंडाविरोधी होते. मुलांचे लग्न साध्या पद्धतीने करीत उपस्थित सर्वांना त्यांनी केवळ आशीर्वाद देण्याची विनंती केली होती.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top