नायडू यांची तेलगू देसम पार्टी तेलंगणात विधानसभा निवडणूक लढणार नाही

हैदराबाद – तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पार्टी आगामी राज्यातील विधानसभा निवडणूक लढणार नाही. राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत तेलगू देसमचे अध्यक्ष कसानी ज्ञानेश्वर यांनी भेट घेतल्यानंतर याबाबतची माहिती दिली.

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास महामंडळाच्या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी अटक झाली असून ते सध्या राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यामुळे तेलंगणात प्रचार करणे त्यांना शक्य होणार नाही. राज्य पक्षप्रमुखांनी केडरला या परिस्थितीची माहिती द्यावी,असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले होते. २०२४ ची निवडणूक तेलगू देसमसोबत लढण्याची घोषणा करणाऱ्या पवन कल्याण यांच्या जनसेनेने ३२ जागा लढण्याची घोषणा आधीच केली आहे. भाजप तेलंगणात पवन कल्याण यांच्या जनसेनेशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु आंध्र प्रदेशात जनसेनेशी हातमिळवणी करण्याची कोणतीही शक्यता भाजपने वर्तवलेली नाही.
तेलंगणात तेलगु देसम पार्टीला २०१४ मध्ये १५ जागा आणि २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत तेलगू देसमला फक्त ३.५१ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत युती केली होती. तेलगू देसमचे निवडून आलेले आमदारही सध्या सत्ताधाऱ्यांसोबत गेले आहेत.
तेलंगणात सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती राज्यात हॅट्ट्रिक करण्यासाठी धडपडत आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top