नारायण राणेंचा पत्ता कट? किरण सामंतच उमेदवार?

रत्नागिरी – भाजपा नेते नारायण राणे यांची सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी कुठल्याही क्षणी जाहीर होईल अशी जोरदार चर्चा सुरू असताना अचानक या मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उमेदवारी नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी किरण सामंत यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केल्याने भाजपाला हा मतदारसंघ सोडावा लागेल, अशी चर्चा आहे. नारायण राणे यांच्या वाढदिवशी भाजपाने लोकसभेच्या 10 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र यात राणे यांचे नाव नसल्याने अधिकच चर्चा सुरू झाल्या. त्यात काल गुढीपाडव्याच्या दिवशी रत्नागिरीत आयोजित महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादी, अजित पवार गटाच्या कार्यकर्ते, उदय सामंत यांच्या कार्यकर्ते यांनी पाठ फिरवली. त्यामुळे मेळावाच रद्द करावा लागला.
आता किरण सामंत यांना केव्हाही उमेदवारी जाहीर होणार अशा शक्यतेने राजकीय पक्षांमध्ये मोठे वादळ उठले आहे. अखेर शिंदेंनी डाव टाकला आणि किरण सामंत यांना उमेदवारी खेचून आणली अशी चर्चा शहरात सुरू असून, लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे उद्योजक किरण सामंत यांना उमेदवारी मिळविण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेले प्रयत्न फळाला येणार आहेत, असे म्हटले जात आहे. एकीकडे शिंदे गटाकडून किरण सामंत यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा असताना, नारायण राणे मात्र माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. नारायण राणे वारंवार जाहीरपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींदरम्यान उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या आजच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे चर्चा रंगली आहे.
किरण सामंत यांनी अजित पवारांच्या भाषणातील एक व्हिडिओ क्लिप व्हॉटसअ‍ॅपवर शेअर केली आहे. अजित पवार भाषणात म्हणत आहेत की, जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीसाठी कोणाच्या बापाला ऐकणार नाही. अजित पवारांचा व्हिडिओ शेअर करत किरण सामंत यांनी धमकीवजा इशाराच दिल्याची चर्चा आहे. किरण सामंत यांना या स्टेटसमधून नेमकं काय सांगायचं आहे आणि कोणाला इशारा द्यायचा आहे याची चर्चा रंगली आहे. दरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण, नाशिक या जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरू असून, येत्या दोन-चार दिवसात हा तिढा सुटेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये धनुष्यबाण चिन्हावरच उमेदवार असेल, असाही दावा केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांचीही यावर चर्चा सुरू असून, याचा निर्णय येत्या दोन-चार दिवसात ते घेतील, असेही सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी -सिंधुदुर्गमध्ये लढण्यास शिवसेनेसह भाजपाही जागा लढवण्यास इच्छूक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून महायुतीचा प्रचार सुरू आहे. या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार असेही सामंत यांनी सांगितले. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मात्र शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी असा महायुतीचा एकत्र प्रचार वेगाने सुरू होईल. तोपर्यंत प्रत्येकजण महायुतीचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top