नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेशचा ‘रामराम’ इंडियात फूट! बैठक रद्द! भाजपचे वजन वाढले

नवी दिल्ली – नरेंद्र मोदींना पर्याय देण्याच्या हेतूने विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीला चौथ्या बैठकीपूर्वीच घरघर लागली आहे. काँग्रेसची वर्चस्वाची भूमिका, पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचा वाद आणि नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत मोदींना मिळालेले घवघवीत यश यामुळे इंडिया आघाडीतून नितीशकुमार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी हे महत्त्वाचे नेते बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. यामुळेच उद्या नियोजित केलेली इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 आणि 4 डिसेंबरला जाहीर झाले. पाच पैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला. या निकालानंतर इंडिया आघाडीने बैठक जाहीर केली होती. उद्या 6 डिसेंबरला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार होती. मात्र अशी कोणती बैठक होणार हेच आपल्याला माहीत नाही, असे सांगत ममता बॅनर्जींनी बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला. मला बैठकीविषयी कोणी सांगितले नाही, फोनवरूनही सूचना दिली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये 6-7 दिवसांचा कार्यक्रम आहे. तो पूर्वनियोजित असल्याने टाळता येणार नाही, असे ममता म्हणाल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी आजारपणामुळे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. मात्र राज्यात ते अन्य कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. इतकेच नव्हे तर उद्या व परवा ते राज्यात जनता दरबारही घेणार आहेत. अखिलेश यादव यांनी विधानसभेतील काँग्रेसवरील नाराजीमुळे लोकसभेला निवडणुकांमध्ये आघाडीत राहायचे की नाही यावर विचार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तेही या बैठकीला अनुपस्थित राहणार हे उघड होते. चेन्नईतील मुसळधार पावसामुळे विमानतळ बंद असल्याने एम.के. स्टॅलिनही या बैठकीला उपस्थित राहणार नव्हते. परिणामी बैठकच रद्द करण्याची वेळ आली.
पण या नेत्यांच्या अनुपस्थितीमागे केवळ हीच कारणे नाहीत. भाजपविरोधी मोट एकत्र बांधल्याने भाजपची निवडणुकांमध्ये दाणादाण उडेल, असे इंडियाच्या सदस्यांना वाटले होते. पण प्रत्यक्षात जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपलाच कौल दिला. परिणामी इंडिया आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली. पाच राज्यांच्या निकालाकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते. पण इंडिया आघाडीची घोडदौड बैठका घेण्यापुरतीच मर्यादित राहिल्याने पाचही राज्यांमध्ये कुठेही भाजप विरुद्ध इंडिया असे चित्र नव्हते. भाजपचा प्रमुख विरोधी प्रतिस्पर्धी येथे काँग्रेसच होता. पण इंडिया आघाडी म्हणून विरोधक लढले नाहीत, तरी पायात पाय घालून एकमेकांना पाडायचे काम मात्र इंडियाच्या सदस्यांनी चोख केले. मध्य प्रदेशात एकत्र लढण्याचा प्रस्ताव अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने काँग्रेसला दिला होता. काँग्रेसने तो धुडकावला. याचा वचपा सपाने मध्य प्रदेश आणि राजस्थानातही उमेदवार उभे करून काढला. समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशात 46 तर राजस्थाानात तब्बल 72 उमेदवार उभे केले. हे उमेदवार निवडून आले नाहीत, पण त्यांनी काँग्रेसची मते खाल्ली आणि भाजपचा विजय सोपा केला.
विधानसभा निवडणुकांमधल्या काँग्रेसच्या भूमिकेवर तृणमूल काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली. हा भाजपाचा विजय नाही, तर काँग्रेसचा पराभव आहे. काँग्रेस जमीनदार मानसिकतेने निवडणूक लढत होती, अशी बोचरी टीका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्या म्हणाल्या की काँग्रेसचा 12 टक्के मते इंडिया आघाडीतल्या पक्षांनी खाल्ली, हे दुर्दैवी आहे. काँग्रेसला एकट्याने निवडणूक लढवायची होती आणि त्यांचा पराभव झाला. अजूनही वेळ आहे, त्यांनी आपल्या उणिवा दूर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडी मजबूत करावी. तसे न झाल्यास त्यांच्या युतीचे नुकसान होईल, असा सल्लाही ममतांनी काँग्रेसला दिला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडियाची मोट बांधण्यासाठी सुरुवातीपासून पुढाकार घेतला होता. इंडियाची पहिली बैठक त्यांच्यात नेतृत्वात आणि यजमानपदात पाटणा येथे यशस्वी झाली होती. नंतरही त्यांनी अनेक नेत्यांची वैयक्तिक भेट घेऊन ही आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना या विरोधी आघाडीचे नेतृत्व करायचे होते. आपणाला पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवावे अशी त्यांची इच्छा होती. नंतरच्या बैठकांमध्ये मात्र ते बाजूला पडले आणि त्यांनी अनेकवेळा इंडिया आघाडीबद्दलची आपली नाराजी व्यक्त करून दाखवण्यास सुरुवात केली.

‘इंडिया’च्या आतापर्यंत तीन बैठका
इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे 23 जूनला झाली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी पुढाकार घेऊन ही बैठक घेतली होती. या बैठकीला 15 पक्षांचे नेते, प्रतिनिधी हजर होते. नंतर ही संख्या वाढत गेली. दुसरी बैठक बंगळुरू येथे 17-18 जुलै या कालावधीत झाली. या दुसर्‍या बैठकीला 26 विरोधी पक्ष एकत्र आले. या बैठकीतच विरोधी आघाडीचे नाव – इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स अर्थात I.N.D.I.A. असे ठरवण्यात आले. इंडिया आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली. यात पाच समिती स्थापन केल्या होत्या. प्रचार समिती, समन्वय/रणनिती समिती, मीडिया, सोशल मीडिया आणि संशोधन समिती या पाच समित्या बैठकीत स्थापन झाल्या. या बैठकीला 28 विरोधी पक्षांचे नेते, प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top