मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवड्यात लागू होणार म्हणताना शिंदे सरकारने आठवड्यात दोनदा मंत्रिमंडळ बैठका घेऊन 70 निर्णयांचा मुसळधार पाऊस पाडला. आजवर अनेक विधानसभा निवडणुका झाल्या आणि निवडणुकीपूर्वी घाईने निर्णय होत होते, पण शिंदे सरकारने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. महायुतीला निवडणूक अडचणीची जाणार असल्याने मतांसाठी सर्वांना खूश करण्याचा हा आटापिटा सुरू असल्याची चर्चा आहे. आजच्या बैठकीत घेतलेल्या 32 निर्णयांत जैन समाजाला महामंडळ आणि एका हिंदुत्ववादी ट्रस्टला मुंबईत मोक्याची जमीन देण्याचाही निर्णय झाला.
मंगळवारच्या बैठकीत 38 निर्णय घेतल्यावर आज आठवड्यातील दुसर्या मंत्रिमंडळ बैठकीत 32 निर्णय घेण्यात आले. त्यातच काल अनेक वर्षे प्रलंबित असलेला मराठी भाषेला राजभाषा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झाला. आज तडकाफडकी अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यात आले. रविवारी मुंबईत मेट्रोचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. सरकारने मनात आणले तर वेगवान काम कसे होऊ शकते ते जनता पाहत आहे.
आजच्या बैठकीत बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी, मच्छीमार समाजांसाठी आर्थिक महामंडळांची घोषणा करून सरकारने सगळ्या समाजांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, अल्पसंख्याक जैन समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. एका ट्रस्टला वडाळा मिठागराची जमीन शाळेसाठी देण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे ट्रस्टने अद्याप शाळेसाठी प्रस्तावही दिला नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय गावठाणाबाहेर उभ्या राहणार्या इमारतींच्या फायद्यासाठी अकृषिक कर पूर्णपणे माफ केला. प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद, राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांच्या रकमेत वाढ, राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे या निर्णयांचाही समावेश आहे.
राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा मुख्य निर्णय घेण्यात आला. विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी. तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करणार आहेत. जैन समाजाचा वाढता दबदबा लक्षात घेऊन जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या महामंडळाच्या कामासाठी 15 पदे मंजूर करण्यात आली. याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यात येणार आहे. तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने ब्राह्मण समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.








