नवी मुंबई- विधानसभेचे मतदान सुरु असतानाच नवी मुंबईतील नेरुळमध्ये शिवाजीनगर केंद्राबाहेर एका गाडीत काही संशयास्पद हालचाली दिसल्या.या गाडीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर राऊटर, लॅपटॉपसह इतर साहित्य सापडले. त्यानंतर मतदान मशीन हॅक करणारी यंत्रणा असावी या संशयावरून तुर्भे पोलिसांनी गाडीसह एकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता मोबाईलमधील चीप टेस्ट करण्यासाठी लागणारी ही सामग्री आहे, असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनीही नंतर असा खुलासा केला की, पोलिसांनी गाडीतून जप्त केलेल्या सर्व वस्तू या मार्कोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आहेत. याचा वापर करून मोबाईलमधील चीप टेस्ट करण्याचे काम केले जाते. ही यंत्रणा मतदार केंद्रावर हॅकिंगसाठी आणण्यात आली नव्हती.

 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								







