पंजाबमध्ये अर्जुन पुरस्कारप्राप्त पोलीस उपअधीक्षकाची हत्या

चंदीगड

पंजाबमधील संगरूर येथे तैनात असलेल्या पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह काल बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर आढळून आला. त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात दलबीर यांचे काही लोकांशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण संपवण्यात आले होते.

या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक बलविंदर सिंग रंधावा यांनी सांगितले की, आम्हाला बस्ती बावा खेलजवळ मृतदेह असल्याची माहिती मिळाली. आमचे एक पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो मृतदेह डीएसपी दलबीर यांचा असल्याचे आढळून आले. ते संगरूर येथे तैनात होते. त्यांच्या डोक्यालाही जखम झाली होती. पंजाब पोलिसांनी प्राथमिक तपासात हा अपघात असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, शवविच्छेदनात दलबीर सिंग यांच्या गळ्यात गोळी अडकल्याचे उघडकीस आले. त्याचबरोबर दलबीर सिंग यांचे पिस्तूलही गायब असल्याचे निदर्शनास आले. दलबीर सिंग यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टीनंतर त्यांनी दलबीर सिंग यांना बस स्टँडच्या मागे सोडले होते. यावेळी दलबीर सिंग यांचे रक्षक उपस्थित नव्हते. दरम्यान, पंजाब पोलीस बसस्थानकाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या प्रकरणी दलबीर सिंग यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top