पश्चिम बंगालमध्ये अवकाळीचा कहर! १२ जणांचा मृत्यू

कोलकाता

पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला. वीज पडून पूर्व वर्धमानमध्ये ५, पश्चिम मेदिनीपूर २ आणि पुरुलियामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. नादियामध्ये भिंत कोसळल्याने २ जणांचा मृत्यू झाला. तर दक्षिण २४ परगणामध्ये झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. याबाबत सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना आपत्ती व्यवस्थापन विभाग पीडितांच्या कुटुंबीयांना मदत आणि भरपाई देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, पश्चिम बंगाल राज्यात १० मे पर्यंत अशीच वादळाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कालपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर उष्णतेशी झुंज देणाऱ्या कोलकात्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तापमानात मोठी घसरण झाली. मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली. पूर्व रेल्वेच्या सियालदह विभागाच्या सियालदह-कॅनिंग मार्गावर जोरदार वाऱ्यामुळे तारांवर झाडे पडल्याने सुमारे तासभर रेल्वे सेवा ठप्प झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top