पाक महिला क्रिकेटपटूंमध्ये हाणामारी नाकातून रक्त वाहिले!३ खेळाडू निलंबित

कराची- सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणार्‍या पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे.नुकतीच पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एका महिला क्रिकेटपटूच्या नाकातून रक्त वाहू लागले. याप्रकरणी आता तीन महिला क्रिकेटपटूंना निलंबित करण्यात आले आहे.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने ही मारहाण करणाऱ्या सदाफ शम्स,युसरा आणि आयेशा बिलाल या महिला क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे.देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेवेळी ही घटना घडली. या महिला क्रिकेटपटू राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी या तिघींमध्ये वाद सुरू झाला.यात सदाफ शम्स आणि युसरा या दोघींनी त्यांच्याच संघातील आयेशा बिलालवर हल्ला चढवला.या मारामारीमुळे आयेशा हिच्या नाकातून रक्त वाहू लागले.

ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. आता या तिन्ही क्रिकेटपटूंवर तात्पूरती बंदी घातली आहे. त्यांना पुढील नोटिस मिळेपर्यंत क्रिकेट खेळता येणार नाही.पाकिस्तान महिला क्रिकेटच्या प्रमुख तानिया मलिक या या प्रकरणी लवकरच चौकशी सुरू करणार आहेत.राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सहा विभागाचे संघ खेळत असतात.यात कराची, लाहोर,पेशावर,क्वेट्टा आणि रावळपिंडी या संघांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top