जळगाव- जिल्ह्यातील पाचोरा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता.या गोविंदाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग चौधरी असे या मृत गोविंदाचे नाव आहे.
पाचोरा पोलीस स्टेशन रोडवरील रिक्षा स्टॅंडवर दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी दहीहंडी फोडणाऱ्या पथकामध्ये नितीन चौधरी हा सहभागी होता. त्यावेळी दहीहंडीसाठी थर लावत असताना अचानक नितीनचा पाय घसरून तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नितीनला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नितीन हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी होत आहे.
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								








