पाटोळे हत्याकांडातील आरोपीची धारदार शस्त्राने उदगावात हत्या

सांगली- सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील दत्ता पाटोळे या तरुणाच्या खुनातील संशयित आरोपी सचिन चव्हाण (२४) याचा पाठलाग करून त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे घडली. निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही कुपवाड येथील रहिवासी आहेत, अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनी दिली.
कुपवाड येथे २०२० मध्ये दत्ता पाटोळे या तरुणाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या आरोपाखाली सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली होती. महिन्याभरापूर्वी तो जामिनावर सुटला होता, त्याचे आई, वडील, भाऊ हे तिघेजण जयसिंगपूर येथील सुदर्शन चौक येथे वास्तव्यास आले आहेत. काल सचिन जयसिंगपूरहून सांगली येथे मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. तेव्हापासून संशयित आरोपी सचिनच्या मागावर होते. दुपारच्या सुमारास सचिन दुचाकीने सांगलीहून जयसिंगपूरकडे जात असताना उदगाव येथील पेट्रोल पंपासमोर संशयितांनी त्याला गाठले आणि त्याची दुचाकी रस्त्यावर पाडली. याचवेळी संशयितांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी तो भीतीने पळत सुटला. शेजारी असणाऱ्या रावसाहेब जालिहाळ यांच्या दुकानात तो गेला. त्यानंतर दुकानाच्या आतील घरात तो शिरला. त्याच्या पाठीमागून संशयित देखील आतमध्ये घुसले. त्यांनी तेथे सचिनवर सपासप वार केले. घरातून सचिन पुन्हा दुकानात आला. याठिकाणी त्याच्यावर पुन्हा वार करण्यात आले. यावेळी त्याच्या हाताची दोन्ही मनगटे तुटून पडली होती. डोक्यातही गंभीर वार झाल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी करून पंचनामा केला. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top