पिंपरी चिंचवडमध्ये बनावट नोटा छाणाऱ्यांवर कारवाई

पिंपरी- पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून ७० हजार रुपयांच्या बनावट नोटी जप्त केल्या असून ६ जणांना अटक केली आहे. बनावट नोटा छापण्यासाठी आरोपींनी चीनमधून ऑनलाइन पद्धतीने कागद मागवला होता. त्यानंतर या टोळीने त्या कागदांवर भारतीय चलनातील नोटा छापल्या. या नोटा घेऊन आरोपी किवळे येथील मुकाई चौकात आला असता पोलिसांनी ही कारवाई केली.
ऋतिक चंद्रमणी खडसे (२२), सूरज श्रीराम यादव (४१) आकाश विराज धंगेकर (२२), सुयोग दिनकर साळुंखे (३३), तेजस सुकदेव बल्लाळ (१९) आणि प्रणव सुनील गव्हाणे (३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी ऋतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविकाधारक आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करतो. आरोपी सूरजला नोटांचे डिझाइन करता येते. पोलीस निरीक्षक आशिष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपींनी छपाईचा व्यवसाय करण्यासाठी दिघीतील मॅगझिन चौक परिसरात गाळा भाड्याने घेतला होता. त्यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईचे जुने मशीन आणले. आरोपींनी बनावट अलिबाबा संकेतस्थळावरुन चीनमधून कागद मागविला. सुमारे दोन लाख बनावट नोटा छापता येतील, इतका कागद आरोपींनी चिनमधून मागवला. पहिल्या टप्प्यात त्यांनी ७० रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या चलनी नोटांची छपाई केली. या नोटा देण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला. ह्या नोटा देण्यासाठी आरोपी ऋतिक किवळे येथील मुकाई चौकात आला. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी ऋतिक आणि त्यानंतर त्याच्या साथीदारांना अटक केली.’ यानंतर पोलिसांनी आरोपींच्या गाळ्यात छापेमारी करत नोटा छापण्याची मशीन आणि इतर साहित्य जप्त केले. या नोटा छापण्यासाठी आरोपींनी शाई कोठून आणली याचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top