पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे १० मार्चला उद्घाटन

पुणे- पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन मागील काही दिवसांपासून प्रलंबित होते. मात्र आता अखेर या टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या १० मार्चला दुपारी १२ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर ४ ते ६ आठवडे या टर्मिनलवरून काही सुरक्षा चाचण्या केल्या जाणार आहेत. या सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरु करण्यात येणार आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन काही महिने उलटले होते. त्यानंतर केंद्रीय नागरी नागरी उड्डयण मंत्री जोतिरादित्य शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी या टर्मिनलची पाहणी केली होती. टर्मिनलचे काम पूर्ण होऊही उद्घाटन होत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता अखेर १० मार्चला या नव्या टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू केले जाणार आहे. १० मार्चला पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल उद्घाटन करणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजनदेखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top