पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर मुस्लिम देशांवर पुन्हा प्रवासबंदी

डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन –

पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास मागील सत्ता काळाप्रमाणेच पुन्हा मुस्लिम देशांवर प्रवासबंदी घातली जाईल, असे अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी सांगितले. शनिवारी रिपब्लिकन ज्यू कोलिशनच्या वार्षिक शिखर परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना शेकडो समर्थकांसमोर ट्रम्प यांनी आपण इस्रायलसोबत असल्याचे जाहीर केले. ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

‘तुम्हाला प्रवासबंदी आठवते का? पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास, पहिल्या दिवसापासूनच मुस्लिम देशांवर पुन्हा प्रवास बंदी लागू केली जाईल. ज्यांना आमचा देश नष्ट करायचा आहे, अशा लोकांना आमच्या देशात प्रवेश दिल जाणार नाही. अशा लोकांनी आमच्या देशात येऊ नये. माझ्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष कार्यकाळात सरकारने लागू केलेल्या प्रवासबंदीला चांगले यश मिळाले. त्या सत्ताकाळात एकही घटना घडली नाही, कारण आम्ही वाईट लोकांना आमच्या देशापासून दूर ठेवले,’ असे ट्रम्प योवेळी म्हणाले. २०१७ मध्ये ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात इराण, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन, इराक आणि सुदानमधील लोकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती. मात्र काही काळाने इराक आणि सुदानसाठी हे निर्बंध हटवण्यात आले.

ट्रम्प यांनी असे वक्तव्य केले की, ‘जो बायडन यांच्या कमकुवतपणामुळे आपला देश नष्ट होईल, अशी भीती वाटत असलेल्या प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मी हे वचन देतो. तुमचा अध्यक्ष या नात्याने मी देशात शांतता प्रस्थापित करेन आणि तिसरे महायुद्ध रोखेन. आज जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर इस्रायलवर कधीही हल्ला झाला नसता. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास मी पुन्हा एकदा इराणवर निर्बंध लादून त्यांचा निधी बंद करेन.
पुन्‍हा सत्तेवर आल्‍यास अमेरिकेच्या शत्रूंना अमेरिकन नागरिकांचे रक्त सांडण्यापूर्वी विचार करावा लागेल. तुम्ही आमच्या रक्ताचा एक थेंब सांडला तर आम्ही तुमच्या रक्ताचे पाट वाहू,’ अशा इशाराही ट्रम्प यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top