पॅलेस्टाईन समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या दोघांना मुंबईत अटक

मुंबई- पॅलेस्टाईन समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या रुचीर लाड आणि सुप्रीत रविश या दोघांना मुंबईतील मानखुर्द येथे पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सभेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता १० ते १५ युवक मानखर्द येथे जमले. त्यानंतर त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत बेकायदेशीरपणे एकत्र येणे, लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा करणे आणि सार्वजनिक सेवकावर बळाचा वापर करणे या गंभीर आरोपांअतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली.
‘या युवकांना परिसरात रॅली काढण्याची किंवा निषेध करण्याची परवानगी नव्हती. त्यांनी आम्हाला सार्वजनिकरित्या एकत्र येण्यासंदर्भात कोणतीच माहिती दिली नव्हती. त्यांनी परवानगी मागितली असती, तरी त्यांना आझाद मैदानात आंदोलनासाठी जाण्यास सांगण्यात आले असते, कारण यापुढे शहरात इतर कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारच्या उपक्रमांना परवानगी नाही. यापूर्वी आंदोलनाचे आयोजक रिव्होल्यूशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या चौघांना आंदोलनापूर्वी परवानगी मागितल्याबद्दल ताब्यात घेतले होते. एकाला माटुंगा येथून तर इतर तीन जणांना मानखुर्द येथून ताब्यात घेतले. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १५१ अंतर्गत या चौघांवर कारवाई करण्यात आली. पण त्यानंतर त्या चौघांनाही सोडण्यात आले.’ अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, महाराष्ट्र यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून अटकेचा निषेध केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top