प. आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टमध्ये २ भारतीयांचा संशयास्पद मृत्यू

यामौसौक्रो – पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टमधील अबिदजान येथे दोन भारतीयांचा संशयास्पद मृत्यू झाला. संजय गोयल आणि संतोष गोयल अशी मृत्यू झालेल्या भारतीयांची नावे आहेत. आयव्हरी कोस्टमधील भारतीय दुतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे दोन्ही भारतीयांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भारतातून इथिओपियामार्गे आयव्हरी कोस्टला जात असताना ही घटना घडली.
संजय आणि संतोष यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही भारतातून इथिओपियामार्गे आयव्हरी कोस्टला जात होते. यावेळी इथिओपिया येथे काही कारणास्तव त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले. यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याबाबत २७ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तसेच भारतीय दुतवासालादेखील या घटनेची माहिती देण्यात आली होती. मदतीसाठी आयव्हरी कोस्ट आणि इथिओपिया या दोन्ही देशांतील भारतीय दूतावासांकडेही संपर्क साधला.
याबाबत आयव्हरी कोस्टमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, आयव्हरी कोस्टमधील आबिदजानमध्ये दोन भारतीय नागरिक मृतावस्थेत आढळले आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही मृतांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी मदत करू. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. दोन्ही भारतीयांचे मृतदेह भारतात परत आणण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top