फडणवीस आदित्यला मुख्यमंत्री करणार होते! उद्धव ठाकरेंच्या नव्या दाव्याने पुन्हा खळबळ

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी मार्गदर्शन करणार होते. आदित्य यांना मार्गदर्शन करून आपण राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनीच मला सांगितले होते. नंतर भाजपावाल्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे पाडले, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात नव्याने खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 2012 मध्ये नरेंद्र मोदी आमच्या घरी आले होते. 2014 मध्ये ते पंतप्रधान झाले. आम्हाला स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. शिवसेना-भाजपमध्ये उत्तम चालले होते. भाजपाने देश सांभाळावा, आम्ही महाराष्ट्र सांभाळू अशी सरळ विभागणी होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर, खासकरून अमित शहा भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर भाजपा बदलला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहांनी आम्हाला विचारले होते, तुम्ही सर्वेक्षण केले आहे का? मी म्हणालो की, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही लढाईत उतरतो. आम्ही सर्वेक्षण करत नाही. शिवाजी महाराजांनीही कोणतेही सर्वेक्षण केले नव्हते.
सर्वेक्षणात तुम्ही हरत असाल, तर तुम्ही लढा सोडून द्याल का? यापूर्वी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी असे भाजपाचे ज्येष्ठ नेते सेनेशी बोलायला यायचे, तेव्हा बाचाबाची व्हायची. नंतर त्यांनी अहंकार आणि आकडेवारीने सुरुवात केली. राजस्थानचे भाजपा नेते ओम माथूर यांना आमच्याशी बोलण्यासाठी पाठवले. बाळासाहेब गेल्यानंतर आमचा वापर करून फेकून द्यायचे असे भाजपाचे गणित होते. शेवटी 2019 मध्ये त्यांनी माझ्यासोबत तेच केले.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे कबुल केल्याचा पुनरुच्चारही केला. ते म्हणाले की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता. अमित शहा यांच्या भेटीत मी तसे सांगितले आणि त्यानंतरच अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. फडणवीस तर तेव्हा दिल्लीच्या राजकारणात जाण्यासाठी तयार झाले होते. त्यांनी मला तसे सांगितले होते. परंतु नंतर त्यांचे वर्तन बदलले. नंतर भाजपावाल्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे पाडले.
उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर फडणवीस यांनीही प्रत्युत्तर देत सडकून टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. आधी त्यांना असा भ्रम झाला होता की, अमित शहा यांनी त्यांना एका खोलीत नेऊन आदित्यला मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगितले. आता असा भ्रम झाला आहे की, देवेंद्र फडणवीस तसे म्हणाले. त्यांना वेड लागले असेल परंतु मला वेड लागलेले नाही. आदित्यला ट्रेनिंग द्या. त्याला उद्या पक्ष सांभाळायचा आहे, असे मी म्हणालो होतो. परंतु त्याला मुख्यमंत्री काय, मंत्रीही बनवण्याचा विचार नव्हता. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, माझ्या मुलाला मुख्यमंत्री बनवा, अशी ठाकरेंची इच्छा होती. केवळ आपल्या परिवाराचाच विचार ठाकरे करत होते.
आज संध्याकाळी अ‍ॅण्टॉप हिलच्या भरणी नाका रोडवर ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या समर्थनार्थ झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांना फटकारले. ते म्हणाले की, मी भ्रमिष्ठ नाही. मी भ्रमिष्ठ आहे की नाही, हे जनता ठरवेल. फडणवीस यांनी मला आदित्यला तयार करतो. अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करतो, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांना मी म्हणालो होतो की, तुम्ही आदित्यच्या हाताखाली काम करणार आहात का? त्यावर फडणवीस म्हणाले, मी दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी ते केंद्रीय अर्थमंत्री होणार होते. अमित शहा यांना कुठल्यातरी खोलीत नेऊन चर्चा केली, असे फडणवीस म्हणाले. परंतु ती खोली कुठलीतरी खोली नसून ती बाळासाहेबांची खोली आहे. ती आमच्यासाठी मंदिरासारखी पवित्र आहे. त्यावेळी तुम्हाला अमित शहांनी या खोलीतून बाहेर बसवले होते.
शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यासंदर्भात म्हणाले की, उद्धव ठाकरे हे अत्यंत खोटे बोलत आहेत. ते खोटारडे आहेत. वास्तविक त्यावेळी आदित्य ठाकरे हे या सर्व प्रक्रियेत कुठेच नव्हते. त्यांना मंत्रीसुद्धा करण्यात येणार नव्हते. शेवटच्या क्षणी त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रश्न येतच नाही. उद्धव ठाकरे यांनी जर बाळासाहेबांना एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, असे वचन दिले असेल तर तो शिवसैनिक ठाकरे यांच्याच घरातला असायला पाहिजे होता का? शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच शिवसैनिक होते का?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे दावे खरे आहेत. त्यांनी सत्य सांगितले आहे. तर खा. विनायक राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी निश्चितच सत्य सांगितले असेल. देवेंद्र फडणवीस हे वचन देऊन तोंडघशी पाडणारी व्यक्ती आहेत. यासंदर्भात दिलेली अधिकची माहिती जेव्हा आमच्यासमोर येईल आणि भूमिका समजेल तेव्हा त्याबाबत आम्ही अधिक सविस्तरपणे बोलू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top